

केंद्रीय मंत्रिमंडळाची
चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १९ ः- केंद्र सरकारने एकूण १३ हजार ४१ कोटी रुपयांच्या पाच पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये ९ हजार ४५० कोटी रुपयांच्या चार रेल्वे मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांसह बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग-२२च्या ८२.५७८ किलोमीटर लांबीच्या मुझफ्फरपूर-सितामढी-सोनबरसा मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. या महामार्ग प्रकल्पासाठी ३ हजार ५९०.७३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. माहिती व प्रसारण आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयांची माहिती दिली.
त्यानुसार चार रेल्वे प्रकल्पांमुळे विद्यमान रेल्वे जाळ्यात सुमारे ४१० किलोमीटरची भर पडणार असून, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील आठ जिल्ह्यांना त्याचा लाभ होईल. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेल्या ६ हजार ४४८ गावांची संपर्क व्यवस्था सुधारण्याबरोबरच प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.
बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग २२ चा मुझफ्फरपूर-सितामढी-सोनबरसा मार्ग हायब्रीड ॲन्युइटी मोडअंतर्गत चौपदरी करण्यात येणार आहे. हा मार्ग सोनबरसा येथील भारत-नेपाळ सीमेला आणि राष्ट्रीय महामार्ग २७ ला जोडणार असल्याने सीमापार व्यापार व वाहतूक अधिक सुलभ होईल. प्रकल्पात बागमती नदीवरील ३४० मीटरचा पूल, तीन रेल्वे ओव्हरब्रिज आणि दोन उड्डाणपुलांचा समावेश आहे. हे प्रकल्प २०३०-३१ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित असून, त्यामुळे दरवर्षी अतिरिक्त ७६ दशलक्ष टन मालवाहतुकीला चालना मिळेल, असेही सरकारचे म्हणणे आहे.
असे आहेत चार रेल्वे प्रकल्प
खरगपूर-भद्रक (राणीताल) चौथा मार्ग
भद्रक-हरिदासपूर चौथा मार्ग
गुम्मिडीपुंडी-गुडूर तिसरा आणि चौथा मार्ग
कटक-पारादीप (बडाबंधा) तिसरा आणि चौथा मार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.