

आरोग्य केंद्र, शाळांसाठी मिळणार २५ कोटी
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे होणार वितरण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ ः जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्य येऊन पाच महिने झाले, तरी अद्याप मतदारसंघातील विकासकामांना एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. यामुळे सर्वच सदस्यांकडून किमान १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळावा, अशी मागणी आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी ठेवून इतर सर्व निधीचे सदस्यांच्या मागणीनुसार वाटप करण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांकडून कळते. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आठवडाभरात निधी वितरणावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आतापर्यंत तीन सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी पहिली सभा ही पदाधिकारी निवडीसाठी, तर उर्वरित दोन सभा नियमित कामकाजाच्या होत्या. १३ ऑगस्ट रोजीच्या सभेत १५व्या वित्त आयोगाच्या निधीसह इतर कामांना निधी मिळाला नाही. ‘मतदारसंघात आम्ही एक काम सुरू करू शकलो नाही,’ अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली. पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर लगेचच विकासकामांना निधी मिळेल, अशी अनेक सदस्यांची अपेक्षा होती. पण विधान परिषद निवडणूक, त्यानंतर आषाढी वारी झाली. तरीही निधी वितरणाची फक्त चर्चाच होती.
अनेक सदस्यांच्या तोंडी मागण्या...
जिल्हा परिषद सदस्यांना मतदारसंघातील कामांच्या याद्या सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार काही सदस्यांनी याद्या सादर केल्या. पण अनेक सदस्यांनी तोंडीच मागणी केल्याने आराखडा तयार करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे सर्वच सदस्यांनी मतदारसंघनिहाय याद्या सादर कराव्यात. आराखडा तयार करून यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात सदस्यांना कामांचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट...
१५व्या वित्त आयोगाकडून प्राप्त ८५ कोटी रुपयांच्या निधी वितरणाबाबत अद्याप चर्चा झाली नाही. याबाबत लवकरच पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सदस्यांकडून मागणी आली आहे. आठवडाभरात आराखडा तयार करून निधी वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
— दीपक वैद्य, अध्यक्ष, जिल्हा परिषद
सर्व सदस्यांकडून कामांच्या याद्या घेतल्या आहेत, पण अद्याप एकाही सदस्याला निधी दिला नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासाठी निधी निश्चित करून सर्व सदस्यांना समान निधी मिळावा, अशी मागणी आहे. याबाबत लवकरच निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.
— अतुल पवार, सदस्य, जिल्हा परिषद
१५व्या वित्त आयोगाचा निधी देण्याची फक्त चर्चाच सुरू आहे. सर्व सदस्यांनी मतदारसंघात आश्वासने देऊन सभागृहात प्रवेश केला आहे. यामुळे सत्ताधारी सदस्यांना एक न्याय व विरोधकांना एक न्याय, असे न करता सर्व सदस्यांना समान निधी द्यावा. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत असा कोणताही भेद न करता समान निधी वाटप करण्यात आला आहे.
— अण्णासाहेब ढाणे, सदस्य, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.