Baramati News : बारामती पाटस मार्गावरील टोलआकारणीस प्रारंभ

राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात आलेल्या बारामती ते पाटस रस्त्यावर उंडवडीनजिक आजपासून टोलआकारणीस प्रारंभ होत आहे. या बाबत भारत सरकारने राजपत्र प्रसिध्द करुन टोलआकारणीस प्रारंभ केलेला आहे.
Baramati News
Baramati Newssakal

बारामती : राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात आलेल्या बारामती ते पाटस रस्त्यावर उंडवडीनजिक आजपासून टोलआकारणीस प्रारंभ होत आहे. या बाबत भारत सरकारने राजपत्र प्रसिध्द करुन टोलआकारणीस प्रारंभ केलेला आहे. एकेरी प्रवासासाठी कार, जीप छोट्या वाहनांसाठी 65 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून एलसीव्ही, एलजीव्ही व मिनीबससाठी 110, बस, ट्रक (दोन अँक्सल) साठी 230, तीन अँक्सल व्यावसायिक वाहनांना 250, चार व सहा अँक्सल वाहनांना 360 तर सात किंवा त्याहून अधिक अँक्सलच्या अवजड वाहनांना 435 रुपये टोल आकारला जाणार आहे.

या टोलनाक्यावर मासिक पासचीही सुविधा देण्यात येणार आहे. टोल प्लाझाच्या 20 कि.मी. पर्यतच्या परिसरात राहणाऱ्या अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी 2023-2024 या वर्षासाठी मासिक पासचा दर 330 रुपये इतका असेल. बारामती ते पाटस या रस्त्यापर्यंतच्या टोलचा हा दर असेल. टोल भरल्याच्या वेळेपासून 24 तासात परतीचा प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. टोल भरल्यापासून एका महिन्यात 50 एकेरी प्रवास करणा-या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 33 टक्के सूट दिली जाणार आहे.

ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड अथवा पर्यायी रस्ता वापरांसाठी उपलब्ध नसेल अशा टोल नाक्यावर जिल्हयात नोंदणी केलेल्या व्यापारी वाहनांना (राष्ट्रीय परवानाधारक (N/P) वगळून) निर्धारीत दराच्या 50 टक्के दराने शुल्क आकारले जाईल. सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान राजस्थानमधील गणेश गहरीया कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडे टोलवसूलीचे कंत्राट सोपविण्यात आले आहे.

दुहेरी भुर्दंड सहन करावा लागणार

पुणे ते सोलापूर व पाटस ते इंदापूर हे दोन स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग असल्याने किमान कि.मी. अंतराची अट येथे लागू होत नसल्याचे सूत्रांनी नमूद केले. उंडवडी ते बेलवाडी या दोन टोलनाक्यातील अंतरही कमी असले तरी येथे टोलवसूलीची विशेष परवानगी अगोदरच घेण्यात आली असल्याचेही नमूद केले. त्या मुळे यात आता कसा मार्ग निघणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुहेरी टोलच्या भुर्दंडातून बारामती, इंदापूरकरांची सुटका कशी होणार हा यातील महत्वाचा मुद्दा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com