पदवीधर निवडणूक - मतदान ओळखपत्र नसेल तर जवळ ठेवा ही कागदपत्रे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र नसल्यास इतर 9 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरता येतील.

पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र नसल्यास इतर 9 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरता येतील. यामध्ये आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड किंवा पारपत्र यासह नऊ कागदपत्रांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. परंतु ते नसल्यास इतर ओळखपत्रही ग्राह्य धरणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी औद्योगिक संस्था यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

हे वाचा - पदवीधरच्या निवडणुकीची तयारी सुरू; विभागीय आयुक्तांनी दिल्या सूचना

खासदार, आमदारांना त्यांचे अधिकृत ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल. संबंधित पदवीधर, शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत पदवी, पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र यापैकी एक मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

मतदार ओळखपत्र नसल्यास ही कागदपत्रे ग्राह्य धरणार : 
आधार कार्ड 
वाहनचालक परवाना 
पॅन कार्ड 
पारपत्र 
केंद्र किंवा राज्य सरकारचे ओळखपत्र 
खासदार, आमदारांना त्यांचे अधिकृत ओळखपत्र 
शिक्षण संस्थेतील पदवीधर किंवा शिक्षकांना दिलेले सेवा ओळखपत्र 
स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना सेवा ओळखपत्र 
पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र 

हे वाचा - शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून तयारी; स्थानिक प्रशासनाला सूचना

छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असल्यास मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे अथवा पटविणे शक्‍य नसल्यास मतदारास पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्‍यक राहील. याबाबत संबंधित अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली आहे. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी असते. मतदानापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: graduate constituency election list of documents if have not voter id card