महागणपतीच्या गाभाऱ्यात दरवळला सुगंध

महागणपतीच्या गाभाऱ्यात दरवळला सुगंध

Published on

शिरूर, ता. ६ : रत्नजडित सुवर्णालंकारांनी सजलेले ‘श्रीं’चे मोहक रूप... शाही वस्त्रसाज, दुर्वांसोबत मोगरा, झेंडू, जास्वंद व गुलाबाची फुले गुंफून अर्पिलेला सुगंधी पुष्पहार आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेला गाभारा यामुळे आज ‘श्रीं’चे रूप अधिकच खुलून दिसत होते. संकष्ट चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महागणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटे पाच वाजता ‘श्रीं’चा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी दर्शनास खुले करण्यात आले. सकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा भक्तिभावात झाला. यामध्ये गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर यांच्या वतीने महागणपतीच्या गाभाऱ्यात रंगीबेरंगी व सुगंधित फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गणेशभक्त भावेश कामदार यांनी १०१ डझन केळींचा, तर वाघाळे (ता. शिरूर) येथील सरपंच रमेश थोरात यांनी २०१ कलिंगडांचा महाप्रसाद ‘श्रीं’ना अर्पण केला.
दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा करून महागणपतीला शाही वस्त्रसाज व सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. दर्शन रांगेतील भाविकांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर आदी उपस्थित होते.
भाविकांसाठी जलद दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याने गर्दी असूनही दर्शन सुलभ झाले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंदिर परिसरात सावली व थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com