पुण्यात पैशांच्या वादातून नातवानेच केला आजीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कल्याणीनगरमधील वृद्धेच्या खुनाचे गूढ उकलले; 48 तासांत लावला छडा 
 कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या खुनाचे गूढ येरवडा पोलिसांनी उकलले. पैशांच्या वादातून 22वर्षीय नातवानेच आजीचा खून केल्याचे उघड झाले आहे. केवळ 48 तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात येरवडा पोलिसांना यश आले. 

पुणे : कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या खुनाचे गूढ येरवडा पोलिसांनी उकलले. पैशांच्या वादातून 22वर्षीय नातवानेच आजीचा खून केल्याचे उघड झाले आहे. केवळ 48 तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात येरवडा पोलिसांना यश आले. चोरीच्या गुन्ह्यात हिमाचल प्रदेश पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपीस अटक करण्यासाठी येरवडा पोलिसांचे पथक हिमाचल प्रदेशमध्ये पोचले आहे.
 
ओशम संजय गौतम (वय 22, रा. हिमाचल प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे; तर चांदणी चौहान (वय 67, रा. सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मनीष आनंद पिंपुटकर (वय 43, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. 
पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशम हा चौहान यांच्या मुलीचा मुलगा आहे. त्याच्या आईचा विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच त्याला दारू, अमली पदार्थांचे व्यसन आहे. आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून त्याचे आजीशी वाद होत. या प्रकाराबाबत चौहान यांनी त्यांच्या मुंबईतील भावाकडे ओशमची तक्रार केली होती. 
हिमाचल प्रदेशमध्ये असताना मित्राची दुचाकी व एटीएम कार्ड चोरून त्याच्या बॅंकेतून दीड लाख रुपये काढून तो पुण्याला पळून आला होता. आजीकडे आल्यानंतर पैशांसाठी झालेल्या वादातून ओशमने तोंड दाबून आजीचा खून केला. त्यानंतर घरातील पैसे, दागिन्यांसह त्याने हिमाचल प्रदेशात पळ काढला होता. 

...असा घेतला पोलिसांनी ओशमचा शोध 
नातेवाइकांच्या जबाबामध्ये ओशमचे नाव पुढे आल्यानंतर सुरक्षारक्षकाकडील नोंदवही, सीसीटीव्ही चित्रीकरण व त्याच्या मोबाईलचे ठिकाण याद्वारे त्यानेच आजीचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे त्याचा शोध घेतला. त्या वेळी तो हिमाचल प्रदेशमध्ये असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे गेले आहे. तेथील पोलिसांकडून त्याचा ताबा घेतल्यानंतर त्यास पुण्यात आणले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandpa murdered by grandson through money dispute At kalyaninar in pune