आईनंतर मुलगा व सासूच्या निधनाचे संकट

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. 13) रमेश प्रभाकर घायतडके यांची आई इंदूबाई प्रभाकर घायतडके यांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची तयारी झाली होती. पण गुरुवारी (ता. 12) संध्याकाळी झालेल्या सहा आसनी रिक्षा अपघातात सासू अनिता बबन कदम (वय 70, प्रवरानगर, जि. नगर) व मुलगा आर्यन रमेश घायतडके (वय 11) यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रभाकर घायतडके यांच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे.

मंचर (पुणे) : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. 13) रमेश प्रभाकर घायतडके यांची आई इंदूबाई प्रभाकर घायतडके यांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची तयारी झाली होती. पण गुरुवारी (ता. 12) संध्याकाळी झालेल्या सहा आसनी रिक्षा अपघातात सासू अनिता बबन कदम (वय 70, प्रवरानगर, जि. नगर) व मुलगा आर्यन रमेश घायतडके (वय 11) यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रभाकर घायतडके यांच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे.

रमेश घायतडके व कुटुंबातील सर्व सदस्य शेत मजूर म्हणून काम करतात. गावातील प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सासू अनिता कदम या नातू आर्यन याच्या वाढदिवसासाठी व इंदूबाई घायतडके यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. आर्यनचा वाढदिवस सोमवारी (ता. 9) साजरा करण्यात आला. आर्यन आजारी पडल्यामुळे त्याला घेऊन आजी अनिता कदम थोरांदळे गावातून सहा आसनी रिक्षातून रांजणी गावाकडे जात होत्या. अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर तीन ते चार मिनिटांतच झालेल्या अपघातात आजी व नातवाचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शुक्रवारी होणारा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम घायतडके कुटुंबाला करता आला नाही. गावावरही शोककळा पसरली आहे. थोरांदळे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये आर्यन शिकत होता. श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली.

दरम्यान, अपघातातील जखमी प्रतीक्षा नथू वाघ (वय 19 रा. रांजणी, ता. आंबेगाव) हिच्यावर पुणे येथे एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रिक्षाचालक प्रसाद बबन सुतार यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अपघात करून पळून गेलेल्या पिकअपचा व चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. कारफाटा, थोरांदळे, चांडोली बुद्रुक फाटा येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. आरोपीला लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक कृष्णाजी खराडे यांनी सांगितले.

मंचर-रांजणी रस्त्यावर 18 वर्षांच्या खालील वाहन चालविण्याचा परवाना नसलेले अनेक जण भरधाव पिकअप गाड्या व ट्रॅक्‍टर चालवतात. दारूच्या नशेत वाहन चालविण्याची संख्या वाढत चालली आहे. विमा नसलेल्या सहा आसनी रिक्षा व इतर वाहनांची संख्या मोठी आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे अशा घटना घडून अनेक निरपराधांचे बळी जातात. पोलिस यंत्रणेने वाहनांची व चालकांची वेळोवेळी तपासणी केल्यास अपघाताच्या घटना टाळता येतील.
- प्रमिला टेमगिरे, सामाजिक कार्यकर्त्या, थोरांदळे, ता. आंबेगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandson & Grandmother Dide In Accident