डॉ. आंबेडकर अध्यासन सुरू करण्यासाठी ७५ लाख रुपयांचे अनुदान : डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Announcement Virendra Kumar grant Union Ministry start this study institute

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सुरू करण्यासाठी ७५ लाख - डॉ. वीरेंद्र कुमार

पुणे : ‘‘देशातील विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास आणि संशोधनासाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासनाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे दरवर्षी ७५ लाख रुपये अशा स्वरूपाचे अनुदान देण्यात येते. पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठानेही अशाच प्रकारचे अध्यासन सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संस्थेत हे अध्यासन सुरू करण्यासाठी देखील केंद्रीय मंत्रालयातर्फे हे अनुदान देण्यात येईल’’,अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली.

सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्रामचे उद्‌घाटन शुक्रवारी डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार, स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, ‘सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कालातीत आहेत. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, असे बाबासाहेबांचे विचार होते. पण देशात आतापर्यंत केवळ ‘गरिबी हटाओ’अशा घोषणा दिल्या जात होत्या. परंतु सगळ्यांना घेऊन विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचलले आणि खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, सबका विकास’त्यादृष्टीने काम सुरू ठेवले.’’

आठवले यांनी माई आंबेडकर आणि मुजूमदार परिवार यांच्यात असणारे जिव्हाळ्याचे नाते उलगडले. तसेच केंद्र सरकारने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयासाठी यंदा एक लाख ४२ हजार ३४२ कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. अन्य मंत्रालयांच्या तुलनेत अर्थसंकल्पात दिलेली ही तरतूद चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ‘पुरी दुनिया मे हे बाबासाहेब का नाम, हम पुरा करेंगे उनका अधुरा काम’,‘शिक्षणाच्या कामात ज्यांनी कधीच मानली नाही हार, त्यांचे नाव आहे डॉ. मुजूमदार’अशा शीघ्र कविता करत आठवले यांनी कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात संजीवनी मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. येरवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्राम’चे वैशिष्ट्ये :

  • खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण देत आहेत, असा अनुभव देणारी रचना

  • सिंबायोसिसच्या स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिक, अभ्यासक, संशोधकांना घेता येणार अनुभूती

  • खास ‘थ्रीडी होमोग्राफी’तंत्रज्ञानाचा झाला वापर

  • ‘सी-डॅक’च्या ह्यूमन सेंटर्ड डिझाइन ॲण्ड कॉम्प्युटिंग ग्रुपने केले विकसित

Web Title: Grant Starting Babasaheb Ambedkar Study Announcement Virendra Kumar Grant Union Ministry Start This Study Institute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top