द्राक्ष सल्ला

द्राक्ष सल्ला
Published on

द्राक्ष सल्ला
-----------------

मॉन्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेत
बागेचे नियोजन
-------------
करपा नियंत्रणासह पाण्याच्या
ताणाचे नियोजन महत्त्वाचे
----------------
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून १७ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात मॉन्सून साधारणपणे ५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता असून, १० ते १५ जूनपर्यंत तो संपूर्ण द्राक्ष पट्ट्यात सक्रिय होईल, असे चित्र दिसत आहे. उपग्रह चित्रांचा आढावा घेतल्यास केरळ, कर्नाटकाचा मोठा बहुतांश भाग तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागांत मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त आणि ढगाळ वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत, म्हणजेच २१ ते २४ मे दरम्यान या भागात मॉन्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ आणि २३ मे रोजी सांगली, मिरज, तासगाव, विटा, मायणी, बारामती आणि फलटण परिसरात चांगल्या पावसाची शक्यता सध्यातरी दिसत आहे. तसेच २३ ते २४ मे दरम्यान सोलापूर, बार्शी, पंढरपूर आणि इंडी भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्या भागात पाऊस होईल, तेथे तापमानात काही प्रमाणात घट होईल. मात्र सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे वातावरण अधिक दमट जाणवू शकते. आठवड्याच्या शेवटपर्यंत पुढील पावसाची शक्यता कमी असली, तरी दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

करपा नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणी गरजेची ः
सापेक्ष आर्द्रता वाढलेल्या परिस्थितीत वाढत्या कोवळ्या फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक फवारणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. कार्बेन्डाझिमऐवजी थायोफिनेट मिथाईल याचाही वापर करता येईल. कार्बेन्डाझिम आणि थायोफिनेट मिथाईल ही दोन्ही बुरशीनाशके बेन्झिमिडाझोल गटातील आहेत. ही बुरशीनाशके पाण्यात मिसळल्यानंतर त्यामध्ये तयार होणारे मेथाइल बेंझिमिडाझोल कार्बामेट हे रसायन काही प्रमाणात सायटोकायनिनसारखे कार्य करते.
द्राक्ष काडीमध्ये घड निर्मिती सुरू असताना सायटोकायनिनची वाढ होणे आणि जिबरेलिक ॲसिडचे (जीए) प्रमाण तुलनेने कमी राहणे हे फायदेशीर ठरते. त्यामुळे या टप्प्यावर या बुरशीनाशकांचा वापर रोग नियंत्रणाबरोबरच घड निर्मितीच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरू शकतो. तसेच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक करपा रोग नियंत्रित करण्याबरोबरच काही प्रमाणात जिवाणूजन्य करपा कमी करण्यासही मदत करू शकते.

घड निर्मितीसाठी योग्य वेळी पाण्याचा ताण महत्त्वाचा ः
खरड छाटणीनंतर साधारणपणे ४५ ते ६५ दिवसांच्या वाढत्या काडीवर किमान १ ते २ दिवस हलका पाण्याचा ताण देणे आवश्यक असते. यामुळे काडीमध्ये सूक्ष्म घड तयार होण्यास मदत होते. सध्या अनेक बागांमध्ये सबकेन तयार करण्यासाठी एक किंवा दोन पिंचिंग झालेली असू शकते. उष्ण वातावरणात पिंचिंगनंतर नवीन फुटी लवकर येण्यासाठी बागेला पाणी दिले जाते. मात्र, अशा वेळी पाणी दिल्यानंतर पाऊस झाल्यास जमिनीत वाफसा येण्यास पाण्याचा ताण देण्यास उशीर होऊ शकतो. २१ ते २४ मे च्या दरम्यान काही भागांत पावसाची शक्यता असल्याने, या भागातील बागायतदारांनी बागेची वाढीची अवस्था लक्षात घेऊन या दरम्यान सिंचन कमी करणे किंवा काही काळासाठी पूर्ण थांबविण्याचा विचार करावा. यामुळे पाऊस झाल्यानंतर बागेत वाफसा लवकर येईल आणि त्यानंतर घड निर्मितीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा ताण योग्य वेळी देता येईल. बागेत पाणी कमी करायचे की पूर्ण थांबवायचे, याचा निर्णय जमिनीत उपलब्ध ओलावा, बागेची अवस्था आणि स्वतःचा अनुभव यांचा विचार करून घ्यावा. अपेक्षित पावसाचे प्रमाण फार जास्त नसल्याने, या काळात सिंचनाचे पाणी कमी करून योग्य वेळी काडीवर पाण्याचा ताण देणे शक्य होईल.

आगामी काळात काही द्राक्ष पट्ट्यात मोठा पाऊस झाल्यास बागेत आवश्यक तो पाण्याचा ताण देणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत बागेत काडीची अतिरिक्त वाढ थांबविणे महत्त्वाचे ठरते. अलीकडे वाढ कमी करणाऱ्या काही रसायनांचा वापर संभावित उर्वरित अंश (रेसिड्यू) राहण्याच्या शक्यतेमुळे टाळला जातो. मात्र भुरीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रायझोल गटातील काही बुरशीनाशकांचा वापर करून काडीची वाढ काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते.
काही अनुभवी द्राक्ष बागायतदारांसोबत चर्चा करत असताना असे लक्षात आले, की रसायनांचा वापर टाळायचा असल्यास दुसऱ्या पिंचिंगनंतर आलेली नवीन फूट काढून टाकल्यास सुद्धा काडीमध्ये घड निर्मिती होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा उपाय करताना काडीची वाढ जोमदार असणे आवश्यक आहे. घड निर्मितीच्या काळात जास्त पाऊस झाल्यास अशा उपायांचा विचार करता येऊ शकतो. परंतु यावेळी काडीवरील पानांच्या संख्येकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन फूट काढून टाकल्यास शेवटी काडीवर किमान १० ते १२ पाने वाढलेली असणे आवश्यक आहे, कारण ही पाने पुढील घड विकासासाठी महत्त्वाची ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com