esakal | अपेक्षित घडनिर्मीती न झाल्याने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष हंगाम अडचणीत

बोलून बातमी शोधा

The grape season in Junnar taluka is in trouble.jpg

जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या (ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने प्रामुख्याने चीन बाजारपेठ काबीज केली आहे. तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे.

अपेक्षित घडनिर्मीती न झाल्याने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष हंगाम अडचणीत
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : निसर्ग चक्रीय वादळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम जुन्नर तालुक्यातील बागेत द्राक्ष घडनिर्मीतीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रतिकुल हवामानामुळे सुमारे २५ टक्के बागेत घडनिर्मीती झालीच नाही तर ६० टक्के बागेत अल्प प्रमाणात लहान आकाराची घडनिर्मीती झाली आहे. या मुळे तालुक्यातील द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या (ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने प्रामुख्याने चीन बाजारपेठ काबीज केली आहे. तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. लोखंडी मंडप, फवारणी व मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर सह अद्यावत यंत्रसामुग्री, ठिबक, कुशल मनुष्यबळ, खते, कीटकनाशके आदी साठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने द्राक्ष हे भांडवली पीक आहे. पुणे जिल्हा बँक व काही राष्ट्रीयकृत बॅंकांनी आर्थिक पतपुरवठा केल्याने तालुक्यातील बहुतेक पदवीधर तरुण द्राक्ष शेती करत आहेत. मात्र नैसर्गिक आपत्तीमूळे सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष शेती अडचणीत सापडली आहे.

या बाबत विघ्नहर द्राक्ष उत्पादक संस्थेचे अध्यक्ष अनिल मेहेर, द्राक्ष उत्पादक गुलाबराव नेहरकर म्हणाले, मागील वर्षी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात छाटणी झालेल्या बागेतील घड जिरल्याने उत्पादनात घट झाली. २० ऑक्टोबर नंतर छाटणी झालेल्या बागेतील द्राक्ष तोडणी हंगाम सुरू होताच कोरोनामूळे निर्यात बंद झाली. लॉकडाऊनमुळे देशांतर्गत वाहतूक सुध्दा बंद झाली. यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची विक्री १५ ते २० रूपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागली. 

या वर्षी खरड छाटणी झाल्यानंतर मे ते ऑक्टोबर अखेर सातत्याने पाऊस पडत आहे. तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीय वादळाचा तालुक्यात वेग ताशी ७० ते १०० किलोमीटर होता. याचा फटका द्राक्षे वेलींना बसला. वाऱ्यामुळे एप्रिल छाटणीनंतर फुटलेल्या कोवळ्या वेली तुटल्या. वेलीवरील पाने फाटले, शेंडे करपले. वाऱ्याच्या वेगामुळे पर्णरंद्र  बंद झाली. यामुळे मालकाडी  तयार झाली नाही. याचा एकूणच परिणाम घड निर्मितीवर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सततच्या पावसामुळे या वर्षी तालुक्यात एक ऑक्टोबरपासून द्राक्ष बागांची छाटणी सुरू करण्यात आली. सततचा पाऊस व निसर्ग चक्रीय वादळाचा दृष्य परिणाम घड निर्मितीवर झाला आहे. सध्या वांझ तपासणीचे काम सुरू आहे.

यामध्ये सुमारे २५ टक्के बागेत घडनिर्मीती झालीच नाही तर ६० टक्के बागेत अल्प प्रमाणात लहान आकाराची घडनिर्मीती झाली आहे. एक वेलीवर (झाडावर) किमान २५ ते ३० घड निर्मिती होणे आवश्यक असताना ६० टक्के बागेत एक वेलीवर पाच ते दहा घड व ते सुद्धा लहान आकाराचे आले आहेत. यामुळे भांडवली खर्च करून देखील अपेक्षित उत्पन्न येणार नसल्याचे निश्चित झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत सापडल्याने द्राक्ष उत्पादक मानसिक दृष्टीने खचला आहे.

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक राहुल बनकर म्हणाले, मागील २० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा भांडवली खर्च करून सुमारे २८ एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे निर्यातक्षम द्राक्ष विक्री मातीमोल भावाने करावी लागली. यावर्षी सुमारे १५ एकर क्षेत्रात अपेक्षित घड निर्मिती झाली नाही. भांडवली खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामूळे शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर म्हणाले, तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीय वादळाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. मात्र त्या वेळी कृषी विभागाने द्राक्ष बागांचे पंचनामे न केल्याने नुकसान भरपाई पासून द्राक्ष उत्पादक वंचित राहिले आहेत. राज्यातील द्राक्ष बागा व उत्पादक शेतकरी  वाचवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने द्राक्ष बागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीनी यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले