इंदापुरात 1200 एकर द्राक्षबागा उद्‌ध्वस्त

Indapur
Indapur

भवानीनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील चार हजार एकरावरील द्राक्षबागांना गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुलोऱ्याच्या स्थितीतील अंदाजे 1200 एकर द्राक्षबागा उद्‌ध्वस्त झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्‍यातील बोरी, काझड, शिंदेवाडी, भरणेवाडी, शेळगाव, निमगाव केतकी, वरकुटे, अंथुर्णे, कळस, बिरंगुडी, कडबनवाडी अशा विविध भागांत द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. 8 जुलैपासून या तालुक्‍यात तीन टप्प्यांत द्राक्षबागांची छाटणी केली जाते व बहार धरला जातो. मात्र 8 जुलैपासून ते 5 ऑक्‍टोबरपर्यंत छाटणी झालेल्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. इंदापूर तालुक्‍यात हंगामातील अंदाजे 200 एकरांवरील द्राक्षबागा असून त्यातील घडांतील मणी या पावसाने फुटले आहेत. या बागांचे पूर्णतः नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. पूर्वहंगामी या बागांबरोबरच ज्या बागा सध्या फुलोऱ्यात व घड तयार होण्याच्या स्थितीत आहेत, त्या बागांना डाऊनीचा मोठा फटका बसला असून मणी व घडांवरही डाऊनीचा प्रादुर्भाव या वेळी पहिल्यांदाच दिसत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. 2017 मध्ये अशीच आपत्ती आली आणि त्यातून द्राक्ष उत्पादक लवकर सावरले नव्हते. तीनच वर्षांत पुन्हा हा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. इंदापूर तालुक्‍यातील द्राक्षे आखाती देशांसह युरोपापर्यंत द्राक्षे निर्यात करतात. निर्यातक्षम उच्च गुणवत्तेची द्राक्षे उत्पादन करण्यात येथील उत्पादकांचा हातखंडा आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे हे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

 
डाऊनीचा सध्या फुलोऱ्यात असलेल्या बागांवर झालेला प्रादुर्भाव वेगळाच आहे. या डाऊनीचे संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, या वर्षी नुकसान प्रचंड होणार आहे. 2017 नंतर द्राक्ष उत्पादकांचा खर्च तर वाया जाणारच, मात्र पुन्हा कर्जाच्या खाईत जातील अशी भीती वाटते.
- रामचंद्र शिंदे, द्राक्ष निर्यातदार बोरी, ता. इंदापूर

फुलोऱ्यातील बागांना मोठा फटका या पावसाने दिला असून, औषधाच्या फवारण्या करूनही उपयोग होईल अशी चिन्हे नाहीत. सुप्तावस्थेतील डाऊनीसाठी पोषक काळ असल्याने मणी व घडांवरही त्याचा फटका दिसू लागला आहे.
- भारत शिंदे, उपाध्यक्ष, बारामती तालुका फलोत्पादक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com