

जगण्याचा संघर्ष उलगडणारी ‘सर्कस’
रोहित वाळिंबे
rohit.walimbe@esakal.com
दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ; तत्कालीन मुंबई प्रांतातील एक सर्कस ही आपल्या संपूर्ण संचासह रंगूनला सादरीकरणासाठी जाते, पण एक दिवस अचानक जपानी सैन्य ब्रह्मदेशाच्या या राजधानीसह त्या अवघ्या मुलुखावरच बाँम्बहल्ला सुरू करते. युद्धाच्या या आगीत स्थानिकांसह मुंबईहून गेलेले सर्कशीतील कलाकार, प्राणीही होरपळून निघतात. आयुष्यभर सर्कशीच्या रिंगणात चित्तथरारक खेळ करणाऱ्या या कलाकारांना आणि प्राण्यांना या युद्धाच्या झळा सोसत मायदेशी येण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग सुरू होतो एक चित्तथरारक प्रवास. या साहसी प्रवासाचे रोमांचकारी वर्णन म्हणजे सिद्धहस्त लेखक विश्वास पाटीललिखित ‘द ग्रेट कांचना सर्कस’ ही कादंबरी.
छोट्या छोट्या तपशिलांसह नेमक्या शब्दांच्या आधारे वाचकांसमोर प्रत्यक्ष प्रसंग उभा करणारी विश्वास पाटील यांची लेखनशैली कादंबरीच्या पहिल्या प्रकरणापासूनच वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते. एकीकडे सर्कशीच्या संचातले टिपलेले बारीकसारीक तपशील आणि दुसरीकडे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे कथेच्या अनुषंगाने उलगड जाणारे स्वभावचित्र आणि त्या जोडीला त्या सर्कशीतील मुक्या जनावरांचे बोलके अस्तित्व यांची लेखकाने कथेत केलेली अजोड गुंफण ही वाचकांसाठी मेजवानीच ठरणारी आहे.
सर्कस म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतो रंगीबेरंगी तंबू, थरारक कसरती आणि टाळ्यांचा कडकडाट; मात्र त्या चमकदार पडद्यामागे कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष, भीती आणि अस्थिर वास्तवाच्या चित्रणाने कादंबरी सुरू होते. विविध ठिकाणी मजलदरमजल करत जाणारा हा संच एक दिवस ब्रह्मदेशात खेळ सादर करण्यासाठी जातो आणि तेथून त्या कलाकारांचे आयुष्य क्षणार्धात बदलून जाते. दुसऱ्या महायुद्धाची झळ ब्रह्मदेशाला बसते; तिथे बाँबहल्ले सुरू होतात आणि भारतीय सर्कस कंपनीही त्यात होरपळून निघते. मग त्या सर्कशीतील कलाकार, प्राणी आणि सामान्य लोकांचा भारताकडे परतण्याचा प्रवास सुरू होतो. या सगळ्या घटनाक्रमाचे शब्दचित्रण अशा पद्धतीने साकारले गेले आहे की, आपणही अनाहूतपणे त्या कलाकारांसह अस्वस्थ होतो; त्यांना मिळालेला दिलासा आपल्यासाठीही दिलासा वाटू लागतो. त्यांच्या संघर्षाशी आपणही समरस होऊन जातो. वाचकाचे कथानकाशी हे समरस होऊन जाणे हेच लेखकाचे यश म्हणावे लागेल.
सर्कशीतील कलाकारांचा आणि प्राण्यांचा जीवघेणा प्रवास; प्रवासातील जंगल, डोंगर आणि नैसर्गिक प्रतिकूलता; उपासमार, मृत्यूचं सावट आणि दुसरीकडे युद्धातील अमानुषता यांचा सामना करत ही मंडळी जगण्यासाठी धडपडत राहतात. या संपूर्ण कथानकात ‘कांचना’ ही व्यक्तिरेखा विशेष उठून दिसते. सर्कशीतील एक कलाकार असलेली कांचना केवळ नायिका म्हणून समोर येत नाही, तर संकटसमयी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री म्हणून वाचकांच्या मनात घर करते. युद्धाच्या भीषण परिस्थितीत, मृत्यूच्या सावटाखाली आणि सततच्या असुरक्षिततेतही ती स्वतःचा धीर ढळू देत नाही. तिच्या स्वभावात संवेदनशीलता आहे, पण त्याच वेळी संकटांना सामोरे जाण्याची ताकदही आहे. प्रवासादरम्यान उपासमार, भीती, थकवा आणि जीवघेण्या प्रसंगांचा सामना करताना कांचना साथीदारांची काळजी घेत राहते. त्यामुळे तिची व्यक्तिरेखा अधिक मानवी आणि जिवंत वाटते. विश्वास पाटील यांनी कांचनाचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे केले आहे. तिच्या मनातील भीती, अस्वस्थता, मायेची ओढ आणि जगण्याची जिद्द लेखकाने सूक्ष्मपणे टिपली आहे. त्यामुळे कांचना ही केवळ सर्कशीतील कलाकार राहत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही न हार मानणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक बनते. त्याचप्रमाणे कादंबरीतील ‘राजमंगल’ ही हत्तीण आणि ‘फक्कडराव’ हा घोडा ही दोन प्राण्यांची पात्रेही लक्ष वेधून घेतात. लेखकाने त्यांना केवळ सर्कशीतील प्राणी म्हणून न रंगवता कथानकातील जिवंत आणि भावनिक घटक बनवले आहे. युद्धाच्या भीषण काळात माणसांप्रमाणेच या मुक्या जीवांनाही उपासमार, थकवा आणि मृत्यूच्या छायेतून प्रवास करावा लागतो. विशेषतः राजमंगल या हत्तिणीचे चित्रण अत्यंत हृदयस्पर्शी आहे. दुसरीकडे फक्कडराव हा घोडा संकटातून धावत राहणाऱ्या जिवंत जिद्दीचे प्रतीकच वाटतो. या दोन्ही प्राण्यांच्या माध्यमातून लेखकाने माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक नातेही संवेदनशीलतेने मांडले आहे. त्यामुळे हे प्राणी केवळ कथानकाचा भाग राहत नाहीत, तर वाचकांच्या भावविश्वाचाही भाग बनतात.
एकूणच, ‘द ग्रेट कांचना सर्कस’ ही केवळ युद्धकथा किंवा सर्कशीच्या जगाची कहाणी नाही, तर ती माणसाच्या जगण्यासाठीच्या अदम्य इच्छाशक्तीची, संकटातही टिकून राहणाऱ्या माणुसकीची आणि प्रतिकूल परिस्थितीत उभ्या राहणाऱ्या नात्यांची हृदयस्पर्शी गाथा आहे. चित्रवेधी भाषा, वेधक प्रसंग आणि जिवंत व्यक्तिरेखा यांमुळे ही कादंबरी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच ते केवळ लेखन न ठरता युद्ध, संघर्ष आणि जगण्याच्या ध्यासाचा अविस्मरणीय अनुभव ठरते.
पुस्तक : द ग्रेट कांचना सर्कस !
लेखक : विश्वास पाटील
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठे : ४०६, मूल्य : ५५० रु.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.