पर्यावरणपूरक प्रकल्पांची नांदी

मीनाक्षी गुरव - GMinakshi_Sakal
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे - शहराची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा-मुठा नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या पहिल्या टप्प्यास सुरवात...नदीपात्रातील लाल आणि निळी रेषानिश्‍चिती...टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखून पावले उचलणे, अशा विधायक आणि सकारात्मक कामांची मुहूर्तमेढ नववर्षाच्या सुरवातीला रोवली जाण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - शहराची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा-मुठा नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या पहिल्या टप्प्यास सुरवात...नदीपात्रातील लाल आणि निळी रेषानिश्‍चिती...टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखून पावले उचलणे, अशा विधायक आणि सकारात्मक कामांची मुहूर्तमेढ नववर्षाच्या सुरवातीला रोवली जाण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील पर्यावरणाचा विचार केला, तर सरते वर्ष विशेष गाजले ते ‘जायका’मुळे. नदी सुधारणेसाठी काही वर्षांपासून निधीच्या प्रतीक्षेत महापालिका होती. या वर्षात ‘जायका’ने नदी सुधारणेसाठी ९०० कोटी रुपयांचा निधी (कर्ज स्वरूपात) मंजूर केला आहे. त्यातील पाच कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला आहे. आता नदीला पुनर्जीवित करण्याच्या कामातील पहिला टप्पा नव्या वर्षाच्या सुरवातीला प्रत्यक्षात येणे अपेक्षित आहे. खरंतर ‘सकाळ’ने २०१६मध्ये ‘मुठा परिक्रमा’ केली आणि ‘मुठाई’च्या उगमापासून संगमापर्यंतची सद्यःस्थिती समोर आणली. विविध पातळ्यांवर त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासनाला लगेच पावले उचलली. ‘सकाळ’ने केलेल्या ‘मुठा परिक्रमे’मुळे नदी पुनर्जीवनाचा मुद्दा पुणेकरांनीही उचलून धरला. म्हणूनच नदी सुधारणेच्या कामाच्या पहिल्या टप्प्यातील पूर्वतयारीची पावले गतीने उचलली. येत्या वर्षांत या टप्प्यातील पान ३ वर 

शेकरूसाठी पुण्यात प्रजनन केंद्र 
केंद्र सरकारच्या ‘एक्‍स सेतू कॉन्झर्व्हेशन ब्रिडिंग प्रोगॅम’अंतर्गत देशातील नामशेष होणाऱ्या प्रजातींचा जंगलाच्या बाहेर नैसर्गिक अधिवासातील प्रजनन प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील आणि देशातील पहिले शेकरू प्रजनन केंद्र पुण्यात होणार आहे. केंद्र येत्या वर्षात पूर्ण होऊन सुरू होणे अपेक्षित आहे. 

टेकड्यांसाठी ‘इव्हेंट’ नको, संवर्धनाची गरज 
शहरातील अनेक टेकड्या कित्येक वर्षांपासून ओस पडल्याचे दिसून येते. टेकड्यांवर वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात; परंतु तो केवळ ‘इव्हेंट’ पुरता मर्यादित राहतो. त्यामुळे येत्या काही महिन्यांत टेकड्यांच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन याबरोबरच तेथील खाणींचे संवर्धन यासाठी प्रकल्प हाती घेतले जावेत. 

तलाव संवर्धनासाठी सकारात्मक पावले 
तलाव संवर्धन हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. पाषाण, कात्रज आणि जांभूळवाडी परिसरातील तलाव हे पुण्याच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत. या तलावांच्या संवर्धनासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीही मंजूर झाला आहे; परंतु या निधीचा विनियोग केवळ कागदोपत्री होण्याऐवजी प्रत्यक्षात पर्यावरण दृष्टिकोनातून तलावांच्या संवर्धनासाठी सकारात्मकपणे पावले उचण्याची गरज आहे. 

वृक्ष प्राधिकरणाची निघणार श्‍वेतपत्रिका
वृक्ष प्राधिकरण २०१६ या वर्षाच्या शेवटी गाजले ते जवळपास दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्यामुळेच. विविध ठिकाणी होणाऱ्या विकासकामांसाठी वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्याचा निषेध विविध संघटनांनी त्या वेळी केला; परंतु येत्या वर्षात वृक्षतोड आणि वृक्षरोपण या कामांची श्‍वेतपत्रिका प्राधिकरणामार्फत काढली जाणार आहे. त्याशिवाय वृक्ष पुनर्रोपणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल.

‘बिबट्या सफारी’चा प्रस्ताव
आफिक्रेच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात ‘बिबट्या सफारी’ सुरू करण्याचा प्रस्ताव वन विभागातर्फे तयार करण्यात येत असून, लोणावळा, शिवनेरी पायथा, चाकण या तिन्हीपैकी एका ठिकाणी या सफारीला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्राचे नूतनीकरण व्हावे.

असे होते २०१६

  • ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आलेली ‘मुठा परिक्रमा’
  • मुठा परिक्रमेनंतर जागोजागी ‘मुठाई’ महोत्सवाचे झाले आयोजन
  • मुळा-मुठाचे पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘जायका’च्या निधीची मंजुरी
  • नदी सुधारणेसाठी केंद्राकडून ५ कोटी रुपये राज्याकडे सुपूर्द
  • गुजरातमधून सिंह आणण्याची प्रक्रिया पूर्ण, खंदकाचे काम सुरू
  • वारजे आणि आनंदवन नागरी वन उद्यानांचे उद्‌घाटन
  • शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन ऑलिंपिक’
  • विविध महोत्सवामध्ये ‘मुठाई’चा जयघोष
Web Title: Green projects precursor