सजवलेल्या बैलगाडीतून नवरदेव लग्नमंडपात!

विजय मोरे ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

सध्या लग्नसमारंभारात चारचाकी आलिशान गाड्यांची क्रेझ वाढत असताना जराडवाडी (ता. बारामती) येथील नवरा मुलगा मात्र चक्क सजवलेल्या बैलगाडीतून करवल्यांसह लग्नमंडपात दाखल झाला. जुन्या रूढी-परंपरेला उजाळा देत हा लग्न सोहळा नुकताच थाटात पार पडला.

 

जराडवाडीत जुन्या परंपरेला

उजाळा देत लग्न सोहळा थाटात

 

उंडवडी : सध्या लग्नसमारंभारात चारचाकी आलिशान गाड्यांची क्रेझ वाढत असताना जराडवाडी (ता. बारामती) येथील नवरा मुलगा मात्र चक्क सजवलेल्या बैलगाडीतून करवल्यांसह लग्नमंडपात दाखल झाला. जुन्या रूढी-परंपरेला उजाळा देत हा लग्न सोहळा नुकताच थाटात पार पडला.

जराडवाडी येथील शेतकरी कल्याण भगवान साळुंके यांचे चिरंजीव अमोल व कडेठाण (ता. दौंड) येथील शेतकरी सुनील भगवान यादव यांची ज्येष्ठ कन्या प्राजक्ता यांचा लग्नसोहळा सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे पार पडला. नवरी मुलगी आपल्या मामाच्या घरी म्हणजे उंडवडी कडेपठार येथे दादा जराड यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती. शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाचीही जबाबदारी मामाने घेतली होती.

नवरदेवाला लग्न सोहळ्यासाठी सजविलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत नेण्याचा विचार मांडण्यात आला. साळुंके कुटुंबातील नवरदेवाचे चुलते मिलन साळुंके आणि करवले सचिन, मयूर, समीर, सौरभ, सारंग व इतर बंधूंनी नवरदेवाला बैलगाडीतून मंडपात नेण्याची संकल्पना मांडली. त्याबाबत बैलगाडीची व्यवस्थाही केली. बाळासाहेब साळुंके यांनी लगेच आपली बैलगाडी उपलब्ध करून दिली. पांढरीशुभ्र बैलजोडीची बैलगाडी नवरदेवासाठी सजली आणि पारंपरिक पद्धतीने सुशिक्षित नवरदेव व नटलेल्या करवल्या आदींसह नवरदेव लग्नमंडपाकडे निघाले. या वेळी वरबाप कल्याण साळुंके आणि वरमाई दीपाली साळुंके यांनासुद्धा बैलगाडीत बसण्याचा मोह आवरला नाही.

या घटनेमुळे पारंपरिक पद्धतीला उजाळा मिळाला. त्यानंतर सर्व बुजुर्ग वऱ्हाडी मंडळींमध्ये स्वतःच्या लग्नाला किती बैलगाड्या होत्या. पारंपरिक पद्धतीने कशी पाच दिवस लग्न लागत. माणसाकडे पैसा कमी होता, पण समाधान होते, याची चर्चा लग्नमंडपात रंगली होती.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: groom escorted traditional bullock cart at wedding hall