शेंगदाण्याने गाठला दीडशेचा उच्चांक

शेंगदाण्याने गाठला दीडशेचा उच्चांक
Published on: 

मार्केट यार्ड , ता. १७ : उत्पादनात मोठी घट, बाजारात कायम असलेली मागणी यामुळे शेंगदाण्याच्या भावांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा शेंगदाणा प्रतिकिलो १५७ रुपयांवर पोहोचला असून, गेल्या पंधरा दिवसांत किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे प्रमुख उत्पादक राज्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात भाववाढीचा कल कायम आहे. त्यातच आगामी पंधरा दिवसांत किलोमागे आणखी चार ते पाच रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची चिन्हे आहेत. दिवाळीच्या काळात फराळासाठी शेंगदाण्याला मोठी मागणी होती. तसेच, खाद्यतेल उद्योगाकडूनही मागणी कायम असल्याने बाजारातील उलाढाल वाढली. सध्या पुण्याच्या बाजारपेठेत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून शेंगदाण्याची आवक होत आहे. दररोज सुमारे एक हजार क्विंटल शेंगदाणा बाजारात दाखल होत असला तरी, उत्पादनातील घट आणि मागणीच्या तुलनेत मर्यादित पुरवठा यामुळे भाव वाढले आहेत.
यंदा कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेंगदाण्याच्या पिकाला पावसाचा मोठा फटका बसला. या दोन्ही राज्यांत सरासरीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन हंगामातील शेंगदाण्याची आवक मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, गुजरात आणि राजस्थानमध्येही अपेक्षित उत्पादनात घट झाली. या राज्यांत केवळ ६० ते ७० टक्के उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, आगामी काळात बाजारातील शेंगदाण्याची उपलब्धता आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गुजरातमधून स्पॅनिश, तर राजस्थानमधून जाडा शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेंगदाण्याचा नवीन हंगाम जानेवारीपासून सुरू होतो. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने नवीन मालाची आवकही कमी राहण्याचा अंदाज आहे.
- गणेश चोरडिया, शेंगदाणा व्यापारी, मार्केट यार्ड

कर्नाटक, आंध्र प्रदेशात शेंगदाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. गुजरात, राजस्थानमध्येही अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मालाची आवक पुरेशी होणार नसून, बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. येत्या पंधरा दिवसांत किलोमागे आणखी चार ते पाच रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात शेंगदाण्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.
- अशोक लोढा, शेंगदाणा व्यापारी, मार्केट यार्ड

घाऊक बाजारातील शेंगदाण्याचा भाव
शेंगदाण्याचा प्रकार - प्रतिकिलो
स्पॅनिश - १४८ ते १५७ रुपये
घुंगरू - १३८ ते १५० रुपये
जाडा - १२० ते १३५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.