esakal | बारामतीकरांनी कसा केला गुढीपाडवा साजरा, वाचा सविस्तर

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांनी कसा केला गुढीपाडवा साजरा, वाचा सविस्तर

एकीकडे बाजारपेठ बंद असली तरी घराघरातून गोडधोड करत कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित करत बारामतीकरांनी सण साजरा केला. 

बारामतीकरांनी कसा केला गुढीपाडवा साजरा, वाचा सविस्तर
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणावर आज कोरोनाचे सावट होते. एकीकडे कोरोना असला तरी बारामतीकरांनी कुटुंबियांसमवेत घरोघरी गुढी उभारून आज गुढीपाडवा साजरा केला. एकीकडे बाजारपेठ बंद असली तरी घराघरातून गोडधोड करत कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित करत बारामतीकरांनी सण साजरा केला. 

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

प्रत्यक्ष परस्परांना शुभेच्छा गतवर्षाप्रमाणे यंदाही दुर्मिळच असल्याने मेसेजद्वारेच लोकांनी पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसरा गुढीपाडवा लॉकडाऊनमध्ये अडकल्याने व्यापा-यांचे कमालीचे नुकसान झाले. गतवर्षीही गुढीपाडव्याला लॉकडाऊन होते, यंदाही तिच स्थिती असल्याने व्यापारी कमालीचे नाराज होते, मात्र तरिही सामाजिक बांधिलकी विचारात घेता व कोरोनाचे संकट पाहून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनीच आज सलग दुस-या दिवशीही आपले व्यवहार बंदच ठेवले. 

दरवर्षी गुढीपाडव्याला बारामतीच्या बाजारपेठेची रौनक काही औरच असते. कपडे, दागिने, वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक्ससह सदनिकांचीही खरेदी लोक मुहूर्तावर करतात. आज बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. बाजारपेठ आज ओस पडल्याने शहर भकास वाटत होते. मिठाई, फळे, हार, गुढी खरेदीसाठीच लोक बाहेर पडले होते. 

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

कोरोनाचे संकट गडद....
दरम्यान बारामतीत काल केलेल्या 1196 जणांच्या तपासणीत 268 जण पॉझिटीव्ह आले आहेत. यात चिंताजनक बाब म्हणजे  209 जणांचे अहवाल अजूनही यायचे आहेत. त्या मुळे हा आकडा वाढण्याची भीती आहे. बारामतीच्या रुग्णसंख्येने आता तीनशेचा टप्पा गाठला असल्याने बारामतीत समूह संसर्ग झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बारामतीच्या रुग्णसंख्येने आज बारा हजारांचा टप्पा ओलांडला. बारामतीत आजमितीस 12174 रुग्ण कोरोनाबाधित झाले असून त्या पैकी 9525 जण बरे झाले आहेत तर मृत्यूचा आकडा 184 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वेगाने होतेय स्थलांतर.....
लॉकडाऊनच्या भीतीमुळे परराज्यातील कर्मचारी आपापल्या गावाकडे परतण्यास उत्सुक होते. गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात पूर्वीसारखेच लॉकडाऊन होईल आणि आपण अडकून बसू या भीतीपोटी बहुसंख्य मजूर आपापल्या गावाकडे परतले आहेत. मिठाईच्या दुकानातील कामगारांपासून ते बांधकामावरील कामगारांपर्यंत व एमआयडीसीतील कंपन्यांपासून ते कंत्राटी कर्मचा-यापर्यंत अनेकांनी बस, रेल्वे प्रसंगी विमानाने गावी परतण्यास प्राधान्य दिले. या मुळे लॉकडाऊनच्या अगोदरपासूनच बारामतीतील अनेक उद्योगांवर सावट पडले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)