भाविकांना मोठा दिलासा

भाविकांना मोठा दिलासा

Published on

गुहा येथील धार्मिक कार्यक्रमांवरील बंदीला स्थगिती
छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : अहिल्यानगर जिल्ह्यातील गुहा (ता. राहुरी) येथील कन्होबा देव ऊर्फ हजरत बाबा रमजान दर्गा परिसरात आजपासून (ता. सात) सुरू झालेल्या यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांवर सर्वसामान्यांना बंदी घालण्याच्या वक्फ ट्रिब्युनलच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आंशिक स्थगिती दिली आहे. न्यायाधीश एस.जी. चपळगावकर यांनी हा महत्त्वपूर्ण हंगामी आदेश देऊन भाविकांना मोठा दिलासा दिला आहे.
वक्फ ट्रिब्युनलने ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना वादग्रस्त ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला धार्मिक कार्यक्रम करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने हा आदेश मूळ अंतरिम आदेशाच्या कक्षेपलीकडे जात असल्याचे नमूद केले. न्यायालयाने स्पष्ट केले, की ९ मार्च २०२३ रोजी दिलेला अंतरिम मनाई आदेश हा केवळ वादातील मूळ पक्षकारांपुरता मर्यादित होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही धार्मिक कार्यक्रमांपासून रोखण्याचा ट्रिब्युनलचा आदेश अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते. या पार्श्वभूमीवर, ‘वादातील पक्षकारांशिवाय इतर कोणालाही धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई’ करणारा ट्रिब्युनलचा आदेश पुढील सुनावणीपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, या धार्मिक उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि वादग्रस्त रचनेचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com