पुणे शहरात ग्रंथालये पुन्हा सुरू करताना...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

-ऑनलाइन सेवा देताना ग्रंथालयाद्वारे जास्तीत जास्त अचूक संदर्भ देण्याचा सल्ला.

-तिनशेहून अधिक ग्रंथालय व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन. 

पुणे : ऑनलाइन सेवा देताना ग्रंथपालांनी जास्तीत जास्त अचूक संदर्भ कसे द्यावेत, लॉकडाऊन नंतर पुन्हा ग्रंथालये सूरू करताना काय काळजी घ्यावी, ई-सामग्री विकास आणि ऑनलाइन ग्रंथालय सेवांमध्ये ग्रंथालय कसे प्रभावी भूमिका बजावू शकते, अशा विविध  विषयांवर ग्रंथालय व्यावसायिकांनी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे माहिती जाणून घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

निमित्त होते, सेंट व्हिन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स आणि यूजीसी-एचआरडीसी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ई-सामग्री  निर्मिती, संवर्धन आणि प्रसार' या विषयावर ग्रंथालय व्यावसायिकांसाठी आयोजित ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट हा दोन आठवड्याचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

या उपक्रमात देशाच्या विविध राज्यातून जवळपास ३६७ ग्रंथपालांनी सहभाग घेतला. यामध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड, आसाम आणि कर्नाटक या राज्यातील ग्रंथपालांनी सहभाग नोंदविला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. 'कोविड १९' च्या परिस्थितीमध्ये  अशा अभिनव उपक्रमांची आवश्यकता आहे. भविष्यात असे कार्यक्रम राबवले जावेत, असे मत सामंत यांनी यावेळी सांगितले.

आंतरशाखीय विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, "ग्रंथालये खूप महत्वाची भूमिका बजावतात. ऑनलाईन सेवा देताना ग्रंथपालांनी जास्तीत जास्त अचूक संदर्भ दिले पाहिजेत."  ग्रंथालये पुन्हा सुरू करताना ग्रंथपालांनी कोणत्या प्रकारचे उपाय केले पाहिजेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ई-सामग्री विकास आणि ऑनलाइन ग्रंथालय सेवांमध्ये ग्रंथालय कसे प्रभावी भूमिका बजावू शकते यावर आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थापन प्रणाली हाताळताना ग्रंथपालांसमोरील  आव्हाने, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आणि लायब्ररीयन, ई-सामग्री आणि वाड्मय चौर्य, शैक्षणिक व्हिडिओ संपादन आणि ई-सामग्री तयार करण्यासाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, वेबसाइट्सची  निर्मिती  आणि ग्रंथालयांसाठी अँड्रॉइड अ‍ॅप तयार करणे, उपयुक्त साधने आणि ई-सामग्री विकासासाठी संसाधने शोधणे, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आर्थिक मंदीमध्ये ग्रंथालये कशी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि प्रभावी ऑनलाइन सेवा पुरविण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका याबद्दल माहिती दिली. सेंट व्हिन्सेंट महाविद्यालयाचे संचालक फादर डॉ. जीवेंद्र जाधव, प्राचार्य डॉ. अनिल अडसुळे, कार्यक्रम प्रभारी डॉ. सुनील शेटे, आदी यात सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidance for Library Professionals