

रासायनिक खतांमुळे निर्माण होणारे अन्नधान्यामधील विषारी अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. हे टाळण्यासाठी सकस, पौष्टिक तसेच जीवनसत्त्वांनी समृद्ध असणारे अन्न सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेतीचा यज्ञ भोर तालुक्यातील वेळू येथील प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांनी सुरू केला आहे. ते विषमुक्त शेतीचे महत्त्व नव्या पिढीला कळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यानांद्वारे जनजागृती करीत आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीचे तंत्र शेतकऱ्यांसह शेतीकडे उद्योग म्हणून पाहणाऱ्यांसाठी पथदर्शी ठरत आहे.
- संतोष खुटवड
भोर तालुक्यातील वेळू येथील प्रयोगशील शेतकरी गुलाब घुले यांनी जीवामृताचा वापर करून तीन एकरांतील फुलविलेली नैसर्गिक शेती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचा ‘पीएमटी बसचालक ते सेंद्रिय शेतीत गिनीज बुकमधील रेकॉर्ड’ प्रवास थक्क करणारा आहे. ते व्याख्याने, शेतीशाळा, शिवार फेरीद्वारे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीचे महत्त्व पटवून देत आहेत. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, यासाठी त्यांनी चळवळच उभी केली आहे. कृषी विभागातर्फे आयोजित प्रशिक्षणे व कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करतात, तर बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांद्वारे नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यावर त्यांचा अधिक भर असतो.
दहावी नापास असलेल्या गुलाब घुले यांना पाठीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पुणे येथील पीएमपीएमएलमधील चालकाच्या नोकरीतून २४ वर्षांनी सेवानिवृत्ती घेतली व ते आईवडिलांसोबत पारंपरिक व रासायनिक पद्धतीने शेती करीत होते. रसायनांच्या अती वापरामुळे शेती नापिक होऊन घरातील सदस्यांना बहुतांश वेळा विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागे. याच दरम्यान त्यांनी सन २०१६ मध्ये ‘ॲग्रोवन’मध्ये नैसर्गिक शेतीविषयी बातमी वाचली. त्यात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी विकसित केलेल्या नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये जमिनीची सुपिकता आणि मातीतील सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी जीवामृताच्या वापराविषयी सविस्तर माहिती होती. यानंतर पाळेकर यांनी आयोजित केलेल्या सेंद्रिय शाळेच्या ९ दिवसीय कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी शेतकऱ्यांना १ देशी गाय ३० एकर शेती पिकवून देते, याबाबत विशेष माहिती दिली. पाळेकर यांच्यामुळे प्रेरित झाल्याने घुले यांचा शेतीविषयी दृष्टिकोणच बदलला. त्यांनी घरची जर्शी गाय विकून नवीन देशी गीर गाय विकत घेतली व विषमुक्त नैसर्गिक शेतीला प्रारंभ केला. त्यांनी २०१७ ला पहिल्यांदा १० गुंठ्यांत जीवामृताचा वापर करून काकडीचे उत्पादन घेतले. त्यातून त्यांनी १ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळविण्याची किमया साधली. रासायनिक कीटकनाशकांवर ४० हजार रुपयांचा वर्षभर होणारा खर्च केवळ चार हजार रुपयांवर आला. सेंद्रिय शेतीचे सर्वांगीण फायदे लक्षात आल्याने त्यांनी नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग सुरू केले व भरघोस उत्पादन घेतले. सध्या त्यांनी वेळू परिसरात १८ शेतकऱ्यांच्या गटशेतीने २५ एकरांत सोयाबीनची लागवड केली आहे.
गुलाब घुले हे जमिनीतील सुपिकतेसह जैवविविधता दीर्घकाळ टिकण्यासाठी पिकांसाठी जीवामृत, दशपर्णी अर्क, तंबाखू अर्क, ताकाची फवारणी, अग्न्यास्त्र, नीमास्त्राचा वापर करतात. त्यातून कसदार भाजीपाला व फळांचे उत्पादन मिळते. त्यास आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पुणे, मुंबईतील आरोग्यप्रेमींकडून २५ ते ५० टक्के अधिक बाजारभाव देऊन प्रतिसाद दिला जातो. यासाठी भाजीपाल्याची व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ‘फार्म टू होम’ डिलिव्हरी केली जाते.
मेथी, कोथिंबीर, पालक, राजगिरा, लालमाठ, काटेवांगी, टोमॅटो, काकडी, दोडका, तसेच दुधी भोपळा आदी ताजा भाजीपाला थेट पोचविला जातो. यातून त्यांना महिन्याला ५० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या पपई, पेरू, आंबे, सीताफळ, चिकू, नारळ यासह तांदूळ, विड्याची पाने आदींना मोठी मागणी असते.
परदेशी अभ्यासक थक्क
गुलाब घुले यांच्या सुभाष पाळेकर नॅचरल कृषी पर्यटन केंद्रास देशविदेश तसेच राज्यभरातील अभ्यासकांसह शेतकरी भेट देत आहेत. नैसर्गिक शेतीची माहिती कळताच प्रथम इटली, लंडन व कतारमधील शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर आतापर्यंत रशिया, व्हिएतनाम, सिरिया, येमेन यासह श्रीलंका, बांगलादेश अशा सुमारे १८ देशांतील शेतकरी व कृषी विषयक अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क आदींच्या अभ्यासाठी २५ ऑगस्ट २०२६ मध्ये आफ्रिका खंडातून २५ शेतकऱ्यांचा गट आला होता. घुले यांच्या नैसर्गिक शेतीचे तंत्र पाहून ते थक्क झाले.
विषमुक्त शेती काळाची गरज
रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे जमिनीचा पोत खालावत असून, मित्र कीटक, पक्षी, फुलपाखरे नष्ट होत आहेत. सेंद्रिय शेतीमुळे जैवविविधतेचे रक्षण होते, विषारी रसायने जमिनीत झिरपल्यामुळे भूगर्भातील आणि विहिरी, कूपनलिकांमधील पाण्याचे स्रोत अशुद्ध होत आहेत. त्यामुळे भविष्यात निरोगी रहायचे असेल तर विषमुक्त शेती काळाची गरज बनली आहे, असे घुले सांगतात.
एका देशी गायीमुळे ३० एकर शेती समृद्ध
एक देशी गाय ३० एकर शेती समृद्ध करू शकते. ती २४ तासांत सुमारे १० किलो शेण देते. तिच्या गोमूत्र व शेणापासून २०० लिटर जीवामृत तयार होते. त्याचा वापर एक एकर क्षेत्रासाठी होतो. तसेच, महिनाभरात ३० एकर शेती पिकू शकते, असे घुले आवर्जून सांगतात.
कुटुंबाची मौलिक साथ
सेंद्रिय शेती विकसित करण्यासाठी गुलाब घुले त्यांच्या पत्नी शिवगंगा, मुलगा प्रसाद व सून हर्षदा यांची मोलाची साथ लाभते. ते विक्रीसाठीही पुढाकार घेतात.
टेरेस, बाल्कनीत विषमुक्त शेती
पुण्यातील डॉ. धनश्री भागवत यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये मागणीनुसार भाजीपाला पुरविला जातो. सध्या इमारतीच्या टेरेसवर, बाल्कनीत बाग फुलवून ताजा भाजीपाला तयार करण्याकडे कल वाढला आहे. कुंडीमध्ये लावलेल्या भाजीपाल्याच्या रोपांची कीडमुक्त वाढ व्हावी, यासाठी घुले जीवामृतही पुरविण्यासाठी पुढाकार घेतात. घुले यांनी तयार केलेल्या जीवामृतामुळे फुलझाडे व भाजीपाल्यास बळ मिळते. पिकांचा टवटवीतपणा कायम राहण्यास मदत होते.
दिग्गजांकडून विषमुक्त अन्नपदार्थांचा आस्वाद
सुभाष पाळेकर नॅचरल कृषी पर्यटन केंद्रातील सकस, आरोग्यवर्धक, विषमुक्त अन्नधान्य, पालेभाज्यांच्या उत्पादनाचे तंत्र अनुभवण्यासाठी अनेक दिग्गजांनी भेट दिली आहे. त्यांनी शिवाई ॲग्रो टुरिझममधील विषमुक्त अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. आतापर्यंत सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, लेखक तसेच अभिनेत्यांनी चुलीवरील जेवणाचा व नैसर्गिक शेती पाहण्याचा आनंद घेतला. यामध्ये नाना पाटेकर, भरत जाधव, संदीप पाठक, महेश टिळेकर, सुरेश विश्वकर्मा पाटील, प्रथमेश परब, मल्हार पाटेकर आदींचा समावेश आहे.
दृष्टिक्षेपात
- विशिष्ट विड्याच्या पानांचा तांबूल (मुखवास) अमेरिकेत विक्री
- शेवग्याच्या शेंगेची गिनिज बुकमध्ये नोंद
- कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडून विषमुक्त नैसर्गिक पिकांच्या छायाचित्रांच्या अल्बमचे कौतुक
नवीन प्रयोगातील पिके
पांढरे जांभूळ, सफरचंद, भिमसेन कापूर, रुद्राक्ष, सेंदूर झाड, ऑल स्पाइस मसाले झाड, एअर पोटॅटो (वेलीवर येणारे बटाटे), बोन्साय संत्रा, फणस,
विलायती वेलदोडे, फॅशन फ्रूट, राय आवळा, ४ किलोचा आंबा, ब्लॅक कस्तुरी मॅंगो, मियाजाकी (जापनीज) मॅंगो, लंगडा आंबा, शतावरी
घुले यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
- शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर
- बियाणांवर पेरणीपूर्वी नैसर्गिक बुरशीनाशक लावून बीज संस्कार
- ठिबकमधूनच जीवामृत व इतर औषधांचा पिके, फळांसाठी वापर
- प्लॅस्टिक मल्चिंगऐवजी काडीकचऱ्याचे आच्छादन, जुन्या साड्यांचा वापर
सेंद्रिय शेतीचे फायदे
- बदलत्या पर्यावरणात सुरक्षित अन्नधान्य मिळते
- जमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात वाढ
- जमिनीची जलधारण क्षमता आणि कस कायम टिकतो
- शेतमालाची पौष्टिक आणि रासायनिक अवशेषमुक्त निर्मिती
- अनेक घातक कर्करोगांपासून मुक्तता
- सेंद्रिय शेतीमुळे हवामान बदलाचे धोके कमी होतात
- जैवविविधता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते
- सकस, पौष्टिक फळभाज्या मिळाल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.
जीवामृताची कमाल
- साडेचार फूट उंचीच्या आंब्याच्या झाडाला २०० आंबे
- अडीच वर्षांच्या फणसाच्या झाडाला १९ फणस लगडले.
- पपईच्या झाडाला २०५ फळे
- शेवग्याची शेंग साडेचार फूट लांब (तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद)
- ज्वारीच्या ताटाची उंची १५ फुटांहून अधिक (तिला ११ कणसे)
- चिक्कूचे वजन - २५० ग्रॅम
- दूधी भोपळा - ३ फूट लांब
- दोडका - ३ फूट लांब
घुले यांना मिळालेले पुरस्कार
- शासनाचा कृषिनिष्ठ पुरस्कार
- कृषिरत्न पुरस्कार
- शेतकरी रत्न पुरस्कार
- विषमुक्त शेतकरी ब्रॅण्ड आयकॉन पुरस्कार.
- लायन्स क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार
- रोटरी क्लबतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार
- महामार्ग पत्रकार संघाचा आदर्श शेतकरी पुरस्कार
62788, 62789, 62791, 62792, 62796, 62799, 62835, 62836
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.