गुंड सोन्या धोत्रे अखेर 'स्थानबद्ध' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonya Dhotre

गुंड सोन्या धोत्रे अखेर 'स्थानबद्ध'

किरकटवाडी - बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण करणे, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे, जबर मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जबरदस्तीने घरात घुसून तोडफोड करणे, जातीवाचक शिवीगाळ करून तेढ निर्माण करणे, व्यावसायिकांना धमकावून पैसे काढून घेणे, असे अनेक गुन्हे (Crime) दाखल असलेल्या व अटक टाळण्यासाठी डेटॉल प्राशन करून उपचार घेताना दवाखान्यातून फरार झालेल्या आणि अटकेनंतर काहीच दिवसांमध्ये जामीनावर सुटून पुन्हा व्यावसायिकास मारहाण करून, तोडफोड करणाऱ्या सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या जयप्रकाश नारायण नगर नांदेड (ता. हवेली) येथील गुंड तुषार उर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे (Sonya Dhotre) (वय. 20) याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख (Dr Abhinav Deshmukh) यांच्या आदेशानुसार हवेली पोलीसांनी तयार केलेल्या स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला (एमपीडीए) (MPDA) महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. ग्रामीण हद्दीतील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यापुढे अशा कारवायांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

सोन्या धोत्रेच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याविरोधात काही नागरिकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या तर काही नागरिक व व्यावसायिक भीतीपोटी तक्रार देण्यास नकार देत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सोन्या धोत्रेवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार केला.

हेही वाचा: 'सरहद' घेणार हजार अफगाणी विद्यार्थ्यांची जबाबदारी; PM मोदींना पत्र

दि. 4 ऑगस्ट रोजी हवेली पोलीस ठाण्याकडून तयार करण्यात आलेला सोन्या धोत्रेच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मंजुरीसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी 11 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव मंजूर केला व त्याच दिवशी हवेली पोलीसांनी सोन्या धोत्रेला त्याच्या एका साथीदारासह वाघोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित प्रस्तावास तातडीने गृहमंत्रालयाच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. दि. 18 ऑगस्ट रोजी गृहमंत्रालयाने सोन्या धोत्रेवरील स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

कारवाई दरम्यान कमालीची गोपनीयता

सोन्या धोत्रेवर स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करताना व अटक करुन कारवाई पूर्ण होईपर्यंत पोलीसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. सुमारे दोन महिने हा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होते. जामीनावर मुक्तता झाल्यानंतर या कारवाईची माहिती मिळाली असती तर सोन्या धोत्रे पुन्हा फरार झाला असता त्यामुळे अशी गोपनीय कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

Web Title: Gund Sonya Dhote Criminal Crime Positioned

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrime