

औंध, ता. १० : संगीतोन्मेष संस्थेच्या विद्यार्थीवर्गातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सुसमधील कांचन धाम येथे संगीत सभा पार पडली. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
अवनिश नाटे याने राग देस आणि ‘अबीर गुलाल’ या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. शिवकन्या काळे यांनी ‘इवलेसे रोप लावियले द्वारी’ ही रचना सादर केली. संतोष मालपोटे यांनी ‘संत संगतीचे काय सांगू सुख’ आणि कबीर यांची ‘अब तुम कब सुमीरो गे राम’ ही रचना सादर करून रसिकांची दाद मिळविली. समीर काशीलकर याने ‘काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती’, तर मुरलीधर पंडित यांनी ‘मोहे लागी आस गुरू चरणन की’ आणि ‘भक्ती ते नमन’ या रचना सादर केल्या.
दीपाली ढमाळ यांनी राग बागेश्रीतील विलंबित एकतालातील ‘कौन गत भई’ हा बडा ख्याल तसेच ‘जारे जारे बदरा तू जा’ हा छोटा ख्याल तयारीने सादर केला. सागर लटपटे, सुनीता गायकवाड, संगीता थोरात, स्वप्ना मते, सपना वाडकर, अनघा तांबे, सार्थक गोळे आणि स्वरा सावदेकर यांनीही विविध रचना सादर केल्या.
कार्यक्रमाची सांगता पंडित यादवराज फड यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. त्यांनी राग दुर्गातील ‘रसिका न दे’ हा ख्याल आलाप आणि तानांनी रंगविला. त्यानंतर ‘द्रुत चतुर सुगरा बालमवा’, ‘श्री पंढरीनाथ पतीत पावना’ आणि भैरवीतील ‘भज मन राम चरण सुखदायी’ या रचनांनी मैफलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर विशाल मोरे व विठ्ठल ढमाळ, तर हार्मोनियमवर अमोल मोरे व मुरलीधर पंडित यांनी साथसंगत केली.
दत्ता पासलकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी बाळासाहेब विनोदे, दिलीप दगडे, राहुल कोकाटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.