esakal | अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हडपसर : येथील पाटबंधारे शाखेचे पत्र व औद्योगिक वसाहत असोसिएशनच्या तक्रारीची दखल घेऊन या वसाहतीमागील नव्या मुठा कालव्यालगत होत असलेली अतिक्रमणे आज उठविण्यात आली. पाटबंधारे विभाग व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

हडपसर औद्योगिक वसाहतीमागून नवीन मुठा कालवा वाहत आहे. या कालव्यालगत आठवडाभरापासून काही नागरिकांकडून बांबू, साड्या व दोऱ्यांचे कुंपन केले जात होते. सुमारे २५० ठिकाणी झोपड्या उभारणीसाठी जागा पकडून हे अतिक्रमण होत होते. याबाबत हडपसर पाटबंधारे शाखेने वरिष्ठ कार्यालयाला पत्र दिले होते. तसेच हडपसर औद्योगिक वसाहत असोशिएननेही त्याबाबत तक्रार दिली होती. सकाळनेही या अतिक्रमणाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

पाटबंधारे विभाग व पालिकेने तातडीने हालचाली करून पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाच जेसीबी, पाच डंपरसह तीनही विभागाच्या सुमारे पाऊनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत येथील अतिक्रमणे काढण्यात आली.

पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर, सुभाष शिंदे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, राजू अडागळे यावेळी उपस्थित होते.

"या कारवाईत नव्याने होत असलेली सुमारे २५० अतिक्रमणासाठी लावलेले बांबू, दोऱ्या, बांधलेल्या साड्या काढून घेण्यात आल्या. जेसीबीने खड्डे घेऊन अडथळेही करण्यात आले आहेत. अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास नियमित कारवाई केली जाणार आहे. पाटबंधारे खात्याने अतिक्रमणे होऊ नयेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.'

-माधव जगताप, पालिका अतिक्रमण विभाग प्रमुख

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण काढण्यासाठी पाच जेसीबी, पाच डंपर, पोलीस वाहने आदी यंत्रसामुग्री, पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे पंचाहत्तर पोलीस कर्मचारी, साठ पालिका कर्मचारी, बिगारी तसेच पाटबंधारे विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह पंचवीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. ही जमवाजमव पाहाता मोठी कारवाई असल्याचा भास होत होता. मात्र, प्रत्यक्षात दीड तासाच्या या कारवाईत केवळ कुंपन म्हणून उभी केलेली लाकडे, बांधलेल्या साड्या, दोऱ्या, फ्लेक्स व चारपाच पत्रे असा मुद्देमाल जमा करून या पथकाला बाहेर पडावे लागले.

loading image
go to top