दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

दिवाळी सणासाठी गावाला जाणाऱ्या नागरीकांची घरे लक्ष्य करुन घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. 

पुणे - दिवाळी सणासाठी गावाला जाणाऱ्या नागरीकांची घरे लक्ष्य करुन घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. 50 हून अधिक घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा व चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये शहरातील वाढत्या घरफोड्या, वाहनचोरी, जबरी चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाकडून गुरूवारी रात्री साडे आठ वाजता हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हे हडपसरमधील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी म्हाडा कॉलनीमध्ये सापळा रचून दोघांना अटक केली. सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19, रा. बिराजदारनगर, हडपसर), सोहेल जावेद शेख (वय 19, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्यांच्यासमवेत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी त्यांच्याकडून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडे तीन किलो वजनाच्या चांदीच्या विटा, पाच कार असा तब्बल 29 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे तब्बल सात व वाहनचोरीचे पास असे एकूण 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तर यापुर्वी आरोपीच्या नावावर घरफोड्यांचे पन्नास गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार हडपसर पोलिस ठाणे 5, लोणी काळभोर पोलिस ठाणे 2 असे घरफोडीचे सात गुन्हे आरोपींनी केले आहेत. तर चारचाकी वाहन चोरीचे दत्तवाडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर, लोणीकंद, शिवाजीनगर यांच्यासह अन्य पोलिस ठाण्यातील गुन्हे असे एकूण 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. 

हे वाचा - घराभोवती घुटमळल्याचा जाब विचारल्याच्या राग; कुटुंबातील 5 जणांवर जीवघेणा हल्ला

हडपसर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींनी यापुर्वीही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये चारचाकी वाहने चोरी करून त्याच वाहनांचा उपयोग करीत घरफोडी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hadapsar police arrested two thief seized over 29 lakh rs gold and money