
हडपसर : महापालिकेत समाविष्ट होऊन आठ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही साडेसतरानळी गावाला पाणी, रस्ते, आरोग्य, आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजपर्यंत सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांचा कर गोळा करूनही पालिकेला गावच्या विकासाची तरतूद करता आलेली नाही. अर्ज, विनंत्या आणि निवेदनांना कायम दुर्लक्षित करण्यात आले आहे. यामुळे येथील क्रांती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांकडून गावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात "लक्ष्यवेधी आंदोलन' करण्यात आले.