विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका
Media Id: NGP२६I१४८३५ Media Id: NGP२६I१४८३६ Media Id: NGP२६I१४८९४ फोटो कॅप्शन- १) लोणारः शेतात साचलेला गारांचा खच २) मासरुळः पावसामुळे शेतातील पिकांचे झालेल नुकसान ३)मोताळा : वादळी वारा व पावसामुळे भुईसपाट झालेले पीक विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार आणि देऊळगावराजा, मोताळामध्ये गारपीट, सर्वाधिक नुकसान सकाळ वृत्तसेवा नागपूर, ता.२०ः विदर्भातील अकोला (अकोट तालुका), बुलढाणा, अमरावती आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीने जोरदार हजेरी लावली. गारपिटीने बुलडाणा, चिखली, लोणार आणि देऊळगाव राजा, मोताळा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या रात्री तर कुठे शुक्रवारी (ता.२०) रोजी वादळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे अवकाळीचा तडाखा; गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान बुलडाणा : मराठी नववर्षाच्या प्रारंभीच अवकाळी पाऊस व गारपिटीने बुलडाणा, चिखली, लोणार आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला. गुरुवारी (ता.१९) दुपार ते सायंकाळ दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी जोर धरला आणि त्यानंतर झालेल्या पावसासोबत गारपीटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह गारपीट झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील वझर आघाव, कासारी, येवती, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, खुरमपूर, अजितपूर, धायफळ या भागात प्रचंड प्रमाणात पाऊस व गारपीट झालेली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कांदा, गहू तसेच इतर पिकांना या अवकाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मासरुळ परिसरात पावसामुळे टाकळी येथील दत्तात्रय गोराडे, भागवत गोराडे तसेच माधव विठोबा शिंबरे यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. सदर पीक नुकसानीची पाहणी तलाठी कृषी सहाय्यक सुसर, महसूल अधिकारी सुरडकर व संबंधित अधिकारी यांनी शुक्रवारी (ता.२०) सकाळी पाहणी केली. परंतु शेतकऱ्यांच्या नुकसानाची तत्काळ भरपाई मिळावी अशी मागणी आता होत आहे. मोताळा तालुक्याला मागील दोन दिवसांपासून वादळी वारा व अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील पिंप्रीगवळी, काबरखेड, चिंचपूर, चावर्दा, वडगाव, तळणी, दाभाडी, तपोवन, पोखरी, सारोळा मारोती, रिधोरा खं., धामणगाव बढे, किन्होळा, ब्राह्मंदा, तालखेड, शेलापूर या १६ गावातील १९८ शेतकऱ्यांचे १०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यामध्ये गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. मात्र पंचनामे झाल्यावर नुकसानीची वास्तविक आकडेवारी कळणार आहे. त्यामुळे बाधित क्षेत्र व गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावल्या गेला आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. बॉक्स... हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान देऊळगाव राजा शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने परिस्थिती गंभीर बनली. या पावसामुळे काढणीस आलेला गहू, शाळू, मका तसेच कांदा, हरभरा यांसारखी पिके बाधित झाली. आंबा, मोसंबी यांसह फळबाग आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. वीज कोसळल्याने मंदिर व घराचे नुकसान डोणगाव : गुरुवारी (ता.२०) सकाळी अचानक हवामान बदलत गडगडाट सुरू झाला आणि सुमारे साडेसातच्या सुमारास आरेगाव रोडवरील वार्ड क्रमांक दोनमधील खंडोबा मंदिरावर वीज कोसळली. या घटनेत मंदिराच्या कोपऱ्याचे नुकसान झाले. मात्र, त्यावेळी मंदिरात पूजा करत असलेल्या मंगला लक्ष्मण काळे या सुरक्षित राहिल्या. गौरव तिफने यांच्या घरावरही वीज पडून नुकसान झाले. वीज कोसळल्याने हरभरा जळून खाक तळणी येथील शेतकरी पद्माकर लक्ष्मण नाफडे यांनी गट नं. ७३ मधील शेतात हरभरा सोंगुण त्याची सुडी लावून ठेवली होती. दरम्यान, गुरुवारी (ता. १९) रात्री या सुडीवर अचानक वीज कोसळली. त्यामुळे सर्व हरभरा जळून खाक झाला. त्यामुळे पीडित शेतकऱ्याचे एक लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने बैल झाला निकामी तालुक्यातील तळणी येथील नीळकंठ वामन भारंबे यांनी गोठ्यात बांधलेल्या बैलावर गोठ्यासमोरील झाड कोसळले. त्यामुळे सदर बैल पूर्णपणे निकामी झाला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्याचे जवळपास ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने शुक्रवारी (ता. २०) तळणी शिवारात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी फटका अमरावतीः जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गहू तसेच माक्याच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. यामुळे बाजारात मिळणाऱ्या दरावरही परिणाम होणार असून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. चांदुरबाजार तालुक्यातील काही गावांना फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु अधिकाऱ्यांनी कुठेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले. मोर्शी तालुक्याला लागून असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संत्रा पिकाला काही प्रमाणात फटका बसला. तर असेगावपूर्णा येथील कांदा उत्पादकांमध्ये वातावरणातील बदलाने भीतीचे वातावरण आहे. अंजनगावसुर्जीतील काही गावांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला आहे. यवतमाळ : घाटंजी तालुक्यात गारपीटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी तसेच टरबूज पिकांचे नुकसान झाले. वादळ वाऱ्यामुळे एका घराची पडझड झाली आहे. शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ८० हेक्टरवरील गहू, ६० हेक्टरवरील हरभरा, दोन हेक्टरवरील ज्वारी तसेच तुर व पाच हेक्टरवरील टरबूज पिकांचे अंदाजे नुकसान झाले आहे. वाशीमः पावसाने भाजीपाला व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास वाशीम तालुक्यातील राजगाव, तामसाळा, तोंडगाव, अनसिंग भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात मंगरुळपीरपरिसरात हलका पाऊस झाला. अकोला ः जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. रात्री (ता.१९) अचानक अकोल्यासह पातूर, बाळापूर व अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अकोट तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. त्यामुळे अकोट तथा पातूर तालुक्यात गहू, मका, पपई, कांदा बियाणे, लिंबू व विविध भाजीपाला पिके बाधित झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काढणीवर आलेल्या गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पातूर तालुक्यातील पांगरा शिवारात मोठ्या प्रमाणात पपई, मका, निंबू, कांदा, केळी, हरभरा, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

