अर्धवट काम करणारी महानगरपालिका 

प्रवीण खुंटे 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे. मागील पंधरा दिवसांपासून त्याकडे कोणी फिरकलेही नाही.

पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे. मागील पंधरा दिवसांपासून त्याकडे कोणी फिरकलेही नाही. या बाबत 2 डिसेंबरला 'सकाळ'च्या अंकात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत कचरा उचलण्याचे काम हाती घेतले होते. परंतु एक महिन्याचा कालावधी संपत आला तरी काम पूर्ण होऊ शकले नाही.

अर्धवट पडलेला कचरा उचलण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून महापालिकेचे कोणीही इकडे फिरकले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. कचरा असाच पडून असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. या दुर्गंधीचा मोठा परिणाम परिसरातील लहान मुले, वृद्ध नागरिक यांच्या सोबतच सर्वांवर होत आहे. कचऱ्यामुळे सतत डास, डुकरे, उंदीर, घुशी, गांडूळ, झुरळ आदींची प्रमाण वाढले आहे. अशा वातावरणात शेकडो कुटुंब येथे राहतात. काही नागरिकांच्या घरांच्या भिंतीला खेटून कचऱ्याची पोती तशीच भरून ठेवली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्याचे रहिवासी सांगत आहेत. परंतु, या गंभीर प्रश्‍नाकडे कोणीही लक्ष देत नाही. यावर बोलताना स्थानिक महिला बानू आलुरे म्हणाल्या ""किती वर्षांपासून हा कचरा इथेच पडून आहे. यामुळे आमची लहान मुले सारखी आजारी पडतात. कोणी नातेवाईकही घरी यायला नाही म्हणतो. इथे राहणाऱ्या नागरिकांचा बराच खर्च दवाखान्यावर होत असतो. सर्दी, खोकला, थंडी तापाने लहान मुले सारखी आजारी पडतात.'' 

आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कचरा उचलण्याचे काम सुरू केले होते. त्यातील अर्धा कचरा उचलून झालेला आहे. हे काम का थांबले आहे याची माहिती घेऊन पुढील दोन-तीन दिवसांमध्येच संपूर्ण कचरा उचलला जावा यासाठी पाठपुरावा केला जाईल. 
- आनंद रिठे, स्थानिक नगरसेवक 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कचरा उचलण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी कर्मचारी कामाला लावून संपूर्ण कचरा साफ केला जाईल. आणि नागरिकांकडून पुन्हा कचरा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. 
- संतोष तांदळे, प्रभारी महापालिका सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Half-working municipal corporation