पुणे : अपंगत्वावर मात करत 'तो' कमावतोय महिना 50 हजार रुपये

पुणे : अपंगत्वावर मात करत 'तो' कमावतोय महिना 50 हजार रुपये

किरकटवाडी : धडधाकट शरीर असूनही केवळ इच्छाशक्ती नसल्याने जीवनात अनेकदा अपयश आलेले काही लोक आपण पाहतो. काही लोकांची इच्छाशक्ती असते, परंतु त्या इच्छाशक्तीला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळत नाही. म्हणूनही अपयशी झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या सर्व लोकांपुढे जन्मत:च पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या चेतनने अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे व्यवसाय चालवत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

किरकटवाडी फाटा येथील एका इमारतीमध्ये चेतन गुलाब हगवणे हा मंगल केंद्र चालवतो. लग्न, वाढदिवस, पूजा, जागरण गोंधळ, डोहाळे जेवण, मुंज किंवा इतर कार्यक्रमांसाठी लागणारी स्वयंपाकाची भांडी, खुर्च्या, टेबल विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य या मंगल केंद्रातून भाडेतत्वावर दिले जाते. चेतनचे वडील गुलाब हगवणे यांचा मंडप बांधण्याचा व्यवसाय आहे. चेतन अपंग असल्याने वडिलांनी त्याला आपल्या व्यवसायाशी संबंधितच मंगल केंद्राचे दुकान सुरु केले. 

बोलण्यात अतिशय नम्रपणा, व्यवहारात चोख व  कष्ट करण्याचा उत्साह यामुळे चेतनचा व्यवसाय अल्पकाळातच भरभराटीला आला. सध्या चेतनची महिन्याची उलाढाल 40 ते 50 हजारांच्या आसपास आहे.

सकाळी स्वतः लवकर येऊन चेतन दुकान उघडतो. ज्या लोकांकडून भांडी परत आलेली नाहीत त्यांच्याशी संपर्क करतो. आलेली भांडी स्वतः  उतरून घेण्यास हातभार लावतो. दुकानात कोणत्या जागी कोणते भांडे ठेवायचे याचे नियोजन त्याने अतिशय नेमकेपणाने करून ठेवलेले आहे. आलेली भांडी मोजून घेऊन तो स्वतः ती सर्व भांडी व्यवस्थित ठेवून देतो. काम करताना कसल्याही प्रकारचा कंटाळा करत नाही. एखाद्या कार्यक्रमातून आलेली भांडी खराब असतील तर तो स्वतः पुन्हा त्यांना धुऊन,पुसून ठेवतो.

नवीन ग्राहक आल्यावर तो अगोदर भांड्याकडे पाहतो. भांडी व्यवस्थित आहेत की नाहीत ते पाहतो. भांडी खराब असतील तर त्याचा धंद्यावर ही परिणाम होतो याचा अनुभव मला सुरुवातीला आला. त्यामुळे लोकांनी भांडी परत देताना थोड्या प्रमाणात जरी खराब दिसत असतील तरी ते मी स्वतः पुन्हा साफ करून ठेवतो. काम करताना काही अडचणी जरूर येतात. उंचावर ठेवलेली भांडी काढता येत नाहीत. दुकानात येणारे ग्राहकही मला मदत करतात. येणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी हाच माझा प्रयत्न असतो, असे चेतन आनंदाने सांगतो.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला चेतन आपल्या व्यवसायात आता चांगला स्थिरावला आहे. धडधाकट शरीर मिळूनही नैराश्याने ग्रासलेल्या अनेक तरुणांपुढे 'चेतन' दीपस्तंभाप्रमाणे उभा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com