खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे पडघम

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे पडघम
Published on: 

उरुळीकांचन, ता. १९ : मतदार यादीच्या वादामुळे मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीची अखेर घोषणा झाली आहे. २१ नोव्हेंबरला मतदान होणार असून, आजपासून (ता. १९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील दोन प्रमुख गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सहकार क्षेत्रात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
हवेली तालुक्यात पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्यानंतर खरेदी-विक्री संघाला सहकारात महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थांवर समर्थकांची वर्णी लावून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय जाळे विणण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून होणार आहे. त्यामुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची ही रंगीत तालीम मानली जात आहे.
बाजार समिती आणि यशवंत कारखान्यावरील अनेक वर्षांची प्रशासकीय राजवट उठल्यानंतर तालुक्यातील सहकार क्षेत्रात आलेली मरगळ झटकली गेली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात ''कालचा शत्रू आजचा मित्र'' असे चित्र दिसत असून, अनेक जण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात गटा-तटांचे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात
एकूण जागा : १९
एकूण मतदार : ३०३ (कृषी पणन संस्था ९३, प्रतिनिधी सभासद २१०)
उमेदवारी अर्ज भरणे : सोमवार (ता. १९) ते सोमवार (ता. २६)
अर्ज छाननी : मंगळवारी (ता. २७)
माघार मुदत : १२ नोव्हेंबर
मतदान प्रक्रिया : २१ नोव्हेंबर

संघाच्या प्रतिष्ठेमागे ''अर्थ''कारण
संस्थेला लाभलेले ''आर्थिक'' वैभव हे या निवडणुकीतील चुरशीचे प्रमुख कारण आहे. संस्थेच्या नावे कोट्यवधींच्या ठेवी असून पुणे मार्केटयार्डातील मोक्याची जागा व इतर मालमत्ता यांमुळे संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय गट प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com