
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील सम्यक दुकानानजिक रस्त्यावर लावलेला हाईट रिस्ट्रीक्टर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
बारामतीत हाईट रिस्ट्रीक्टर नागरिकांसाठी डोकेदुखी
बारामती - शहरातील भिगवण रस्त्यावरील सम्यक दुकानानजिक रस्त्यावर लावलेला हाईट रिस्ट्रीक्टर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी अवजड वाहने या हाईट रिस्ट्रीक्टरला अडकल्याने वाहतूकीची कोंडी होणे ही बाब नित्याची झाली असून प्रशासनाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी व अधिकारी यांना वारंवार सांगूनही या बाबत कोणीही काहीही करायला तयार नसल्याची लोकांची भावना आहे.
रेल्वे उड्डाणपूलावरुन अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये या उददेशाने सातव चौक व सम्यक दुकानानजिक हाईट रिस्ट्रीक्टर उभारण्यात आला आहे. मध्यंतरी काही व्हीआयपी दौ-यामुळे सातव चौकानजिकचा हाईट रिस्ट्रीक्टर उंच केला गेला. पुणे बाजूकडून येणारी वाहने सातव चौकातून सहजतेने पुढे येतात मात्र सम्यकनजिकच्या हाईट रिस्ट्रीक्टरला अडकतात. अवजड वाहनामागेही वाहने लागूनच असल्याने तेथे काही क्षणात वाहतूकीची कोंडी होते.

एकामागोमाग वाहने ओळीत उभी असल्याने अवजड वाहनांना गाडी पाठीमागे घेणेही अवघड होऊन बसते आणि या ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयार होते. हे प्रसंग दैनंदीनच होत असल्याने त्याचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागत आहे.
एकतर हा हाईट रिस्ट्रीक्टर काढून टाकावा किंवा दोन्ही बाजूंकडील हाईट रिस्ट्रीक्टरची उंची समान असावी जेणेकरुन पहिल्या कमानीतून वाहन आल्यानंतर दुस-या कमानीत ते अडकून पडू नये. वास्तविक या बाबत प्रशासनाच्या अधिका-यांची जबाबदरी असतानाही व अनेकदा सांगूनही त्याच्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नसल्याने नागरिक संतप्त आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बाबत माहिती देणार असल्याचे काही स्थानिकांनी या बाबत सांगितले.
Web Title: Headaches For Height Restricted Citizens In Baramati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..