....आणि गुरुजींनी मारली प्र-कुलगुरूंना मिठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

लहानपणी शिकविणाऱ्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांचा वेगळाच जिव्हाळा असतो. विद्यार्थ्याबद्दलही शिक्षकांची ममता तशीच असते. याचाच प्रत्यय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आला. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचे गुरुजी बसवंत भरले त्यांना भेटायला आले अन्‌ आपल्या विद्यार्थ्याला मिठी मारली. उमराणी यांनीही नतमस्तक होऊन त्यांचे स्वागत केले.

पुणे - लहानपणी शिकविणाऱ्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांचा वेगळाच जिव्हाळा असतो. विद्यार्थ्याबद्दलही शिक्षकांची ममता तशीच असते. याचाच प्रत्यय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आला. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचे गुरुजी बसवंत भरले त्यांना भेटायला आले अन्‌ आपल्या विद्यार्थ्याला मिठी मारली. उमराणी यांनीही नतमस्तक होऊन त्यांचे स्वागत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसह अनौपचारिक बैठक सुरू असताना ८० वर्षांचे भरले गुरुजी तेथे आले. उमराणी यांना बघताच गुरुजींनी त्यांची थेट गळाभेट घेतली. ते पाहून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सद्‌गदित झाले. गुरू-शिष्याच्या आठवणी ताज्या होत असताना दोघेही भावुक झाले.

प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी इयत्ता सातवीत सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे गावातील शाळेत शिकत होते. त्या वेळी १९७२ मध्ये दुष्काळ पडलेला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने भरले गुरुजी यांनी उमराणी यांच्यासह काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते. आता हाच विद्यार्थी पुणे विद्यापीठाचा प्र-कुलगुरू झाल्याने खास त्यांना भेटण्यासाठी म्हणून गुरुजी भंडारकवठे या गावातून उमराणी यांना भेटण्यासाठी पुणे विद्यापीठात आले. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांपुढे त्या दोघांनाही थोडेसे अवघडल्यासारखे झाले होते. कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हा अनपेक्षित प्रसंग अनुभवता आला.

डॉ. उमराणी म्हणाले, ‘‘गुरुजींना भेटल्याचा मनस्वी आनंद तर झालाच; पण त्या ऋषितुल्य व्यक्तीचे पाय धरण्याची पुन्हा एकदा संधी मला मिळाली. या भेटीमुळे गतकाळ पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आला.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: headmaster meet to vice chancellor