गुरूजी तुम्हीसुध्दा? ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज लाटण्याचा प्रयत्न

संतोष शेंडकर
Wednesday, 30 December 2020

मुरूम (ता. बारामती) येथील राजेंद्र गुराप्पा गायकवाड या प्राथमिक शिक्षकाने ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे तयार करून गृहकर्ज मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उजेडात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय आज घेतला आहे. कर्जवितरण करणाऱ्या संस्थेनेही बनावट कागदपत्रांचा प्रकार उजेडात आल्यावर कर्जवितरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमेश्वरनगर - मुरूम (ता. बारामती) येथील राजेंद्र गुराप्पा गायकवाड या प्राथमिक शिक्षकाने ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे तयार करून गृहकर्ज मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उजेडात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय आज घेतला आहे. कर्जवितरण करणाऱ्या संस्थेनेही बनावट कागदपत्रांचा प्रकार उजेडात आल्यावर कर्जवितरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र गायकवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राख (ता. पुरंदर) येथे कार्यरत आहेत. मुरूम ग्रामपंचायत हद्दीत ते राहतात. त्यांनी बारामती येथील शुभम हाऊसिंग फायनान्स या कर्जवितरण संस्थेकडे गृहकर्जासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावात घराचे उतारे, ग्रामपंचायतीची कागदपत्रे सादर केली होती. फायनान्स कंपनीने ग्रामपंचायतीकडे चौकशी केली आणि त्यामध्ये सदर शिक्षकाने ग्रामपंचायतीकडून कुठलीही कागदपत्रे न घेता खोटी कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आज ग्रामपंचायतीची मासिक बैठक झाली आणि त्यामध्ये सदर शिक्षकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसेवक संजयकुमार भोसले यांनी याबाबत प्रसिध्दीपत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निलेश शिंदे म्हणाले, सदर शिक्षकाने शासकीय कर्मचारी असतानाही गायरान क्षेत्रात घर बांधले आहे. शिवाय फायनान्स कंपनीला ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड, शिक्के व बनावट उतारे सादर करून सरकारी यंत्रणेचीच फसवणूक केली आहे. त्यांच्यावर शिक्षण विभाग, पोलिस, पंचायत समिती या सर्व ठिकाणी कारवाईची शिफारस करणार आहोत.   

पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शुभम फायनान्सचे बारामतीचे शाखाधिकारी नाथाजी देठे म्हणाले, आम्ही सुमारे साडेनऊ लाखांचे कर्ज मंजूर केले होते. परंतु कर्जवितरणाआधी प्रत्यक्षदर्शी चौकशी केली तेव्हा कागदपत्रे पूर्णपणे फसवेगिरीची असल्याचे निदर्शनास आले. आमच्याकडे दिलेले लेटरपॅड वेगळे असल्याचे व उतारेही हाताने लिहलेले आढळले. त्यानंतर त्यांचे कर्जवितरण थांबविण्यात आले आहे. याबाबत राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headmaster trying defraud submitting fake documents GramPanchayat