विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

जनार्दन दांडगे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पूर्व हवेलीसह जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड यांनी केले.

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पूर्व हवेलीसह जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड यांनी केले.

आठ दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये नेत्ररोग, स्त्रीरोग, हाडांचे आजार, बालरोग, मधुमेह, दातांचे आजार, शल्य चिकित्सा अशा आजारांवर मोफत सल्ला व उपचार होणार असून दुभंगलेल्या ओठांवर मोफत शस्त्रक्रिया व एमआरआय, सीटी स्कॅन सारख्या तपासणीवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, 'एमआयटी'चे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष माधव काळभोर, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड, डॉ. राम, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड, सुदर्शन चौधरी, सुनील कांचन उपस्थित होते.

यावेळी आदिती कराड म्हणाल्या,"ग्रामीण भागातील रुग्णांना अल्प दारामध्ये प्रभावी वैद्यकीय सेवा मिळाव्यात या हेतूने 'एमआयटी'च्या वतीने दोन वर्षापूर्वी विश्वराज हॉस्पिटल सुरु करण्यात आले. या काळामध्ये सुमारे २५ हजार बाह्यरुग्ण व १ हजार ५०० इतक्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच भविष्य काळामध्ये रुग्णांसाठी ओपन हार्ट सर्जरी, एमआरआय व न्युरो सर्जरी अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच दोन वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील विविध सामाजिक व खाजगी संस्थांच्या मदतीने एकूण ५२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली व त्याचा सुमारे २० हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे."

यावेळी राहुल कराड म्हणाले,"एमआयटी या संस्थेनी शिक्षण क्षेत्राबरोबर वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेण्याच्या हेतून विश्वराज हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये पुण्यासारख्या शहरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवा ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दारामध्ये पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे. यासाठी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला स्थानिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

शिबिरासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आशिषकुमार दोषी यांनी मानले.

राज्यातील शिधापत्रिका धारक कुटुंबाना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. यामध्ये लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलचा समावेश करण्यात यावा यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.     
 

Web Title: health care camp for various decease