कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या काय आहे आरोग्य तज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021


राज्यात अमरावती येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवीन ‘स्पाइक’ नोंदला. तेथे गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे तीन हजार ८० रुग्ण नोंद झाली होती. हा आतापर्यंतचा उच्चांक होता.

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट राज्यात येण्याची शक्यता कमी आहे, असे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण, कोरोनाचा धोका पूर्ण टळला नसल्याने नागरिकांनी सुरक्षेची खबरदारी घेणे आवश्यकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा पुन्हा सुरू झाली. या पार्श्वभूमिवर ‘सकाळ’ने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी साधलेल्या संवाद त्यांनी हे मत व्यक्त केले.

अशी आहे स्थिती
- राज्यात २ फेब्रुवारीला ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांची नोंद
- पुढील नऊ दिवसांमध्ये म्हणजे ११ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या ३० हजार २६५ पर्यंत कमी
- त्यानंतरच्या नऊ दिवसांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढले
- राज्यात १९ फेब्रुवारीपर्यंत ४० हजार ८५८ रुग्ण संख्या
- त्यामुळे दुसऱ्या लाटेची चर्चा पुन्हा सुरू

अकोला, अमरावतीसारख्या काही भागांत कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही काळजी वाढविणारी आहे. त्याला दुसरी लाट किंवा आणखी काहीही म्हटले तरीही ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाय योजले पाहिजे. पुढील पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ठोस पावले टाकली पाहिजे. या भागातील कोरोनाचा उद्रेक तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.
- डॉ. सुभाष साळुंके, निवृत्त महासंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही यापूर्वीप्रमाणे उद्रेकाची ही धोकादायक पातळी निश्चित नाही. रुग्णसंख्या वाढून पुन्हा काही दिवसांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात रुग्णसंख्या कमी-जास्त होत राहील.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

अमरावतीत नवीन ‘स्पाइक’
राज्यात अमरावती येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवीन ‘स्पाइक’ नोंदला. तेथे गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे तीन हजार ८० रुग्ण नोंद झाली होती. हा आतापर्यंतचा उच्चांक होता. पण, त्यानंतर १८ फेब्रुवारीला एका दिवसात चार हजार रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. हा अमरावती येथील हा आतापर्यंतची सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

हे विसरू नका
- मास्कचा वापर करा
- तोंड व नाक झाकले जाईल असा पद्धतीने मास्क वापरा
- सेनिटायझरचा वारंवार वापर करा
- हात व्यवस्थित धुवा
- सोशल डिस्टन्स पाळा
- गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
- ‘काही होत नाही’ वृत्ती सोडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health experts said no Second Corona wave but need be careful