
Pune : आयटीयन्सचे आरोग्य क्षेत्रात अनोखे स्टार्टअप
पुणे : कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलो तर आपला टिकाव लागणार नाही... 20 वर्षे काम केलेले क्षेत्र अचानक कसे सोडायचे... नवीन काहीतरी करायचा प्रयत्न फसला तर काय?... व्यवसाय करणे सोपं नाही... असे एक ना अनेक प्रश्न आपले क्षेत्र सोडून दुसऱ्या फिल्डमध्ये काम सुरू करताना पडतात. या सर्व शंका दूर करून 20 वर्षांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात उच्चपदस्थ पातळीवर काम करणाऱ्या एका आयटीयनने स्वतःचे स्टार्टअप सुरू करीत अनेक तरुणांचे कौशल्य विकसित केले आहे.
आरोग्य सेवा पुरविणारे क्षेत्र देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात चांगले दिसण्यासाठी वैद्यकीय मदत घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या तरुण आणि तरुणींची संख्या मर्यादित आहे. यातील संधीबाबतची अनेकांना माहिती नाही. कमी शिक्षणात आपल्याला कोण नोकरी देणार, अशी अनेकांची मनःस्थिती आहे.
त्यांची ही मानसिकता दूर करीत त्यांना आरोग्य क्षेत्राशी संबंधित कौशल्य पुरविण्याचे काम नंदन गिजरे यांचे ‘आय टू कॅन’ (I2CAN) स्टार्टअप करीत आहे. हे स्टार्टअप अस्थेटिक मेडिसिन (सौंदर्य चिकित्सा), कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजीचे प्रशिक्षण देते. देशभरातील सहा हजारहून अधिक डॉक्टर, थेरपिस्ट आणि सहायक कर्मचाऱ्यांना स्टार्टअपकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मुळचे नागपूर येथील असलेल्या गिजरे यांनी बीई इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तब्बल 20 वर्ष टीसीएस, आयबीएम आणि कॉग्निझंट अशा बड्या आयटी कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चौकटीच्या बाहेरचा विचार करीत स्वतःचे विश्व निर्माण करण्यासह कौशल्यपूर्ण समाज निर्माण करण्याच्या कामात हातभार लावण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली.
"वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. ‘एआय’चा वापर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र हे बदललेले तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कौशल्यपूर्ण व्यक्तींची कमतरता असल्याचे दिसते. अधिकाधिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आपली आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत."
-नंदन गिजरे, संस्थापक, संचालक, आय टू कॅन