
पुण्यात उन्हाचा चटका वाढणार
पुणे - शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांपासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
शहरात शनिवारी ३७.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २४.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत (ता. १८) शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. असे असले तरी कमाल तापमानात हळू-हळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरात पुणे आणि परिसरात पारा पुन्हा ४१ अंशांच्या घरात पोहचू शकतो. त्यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
‘असानी’ चक्रीवादळ निवळल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा ताप पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भात तर पारा ४५ च्या पुढे पोहचला आहे. दरम्यान, रविवारी (ता. १५) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे. राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४६.५ तर नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे १७.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनासाठी पोषक हवामान निर्माण होत आहे. तर सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
Web Title: Heat Increase In Pune Summer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..