

पान १२ - २साठी
------------------
वाढत्या तापमानाचा गाई-म्हशींवर ताण
-------------------------------
उष्णतेचा ताण म्हणजे केवळ जनावराला गरम वाटणे नव्हे, तर शरीरात उष्णता निर्माण होणे आणि ती बाहेर टाकण्याची क्षमता यांच्यातील असमतोल होय. याचा थेट परिणाम चारा सेवन, रवंथ, पचन, दूध उत्पादन, प्रजनन आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो. हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
------------
डॉ. गणेश निटुरे
--------------------------------
शास्त्रीय अभ्यासानुसार, तापमान- आर्द्रता निर्देशांक (टीएचआय) ६८ ते ७२ च्या वर गेल्यास उच्च उत्पादनाच्या गाईंमध्ये ताण सुरू होतो. भारतीय संकरित गाईंसाठी सुमारे ७२ आणि म्हशींसाठी सुमारे ७५ हा उंबरठा मानला जातो. म्हशींमध्ये कमी घामग्रंथींमुळे अधिक संवेदनशील असतात.
शरीरात होणारे प्रमुख बदल :
१. शरीराचे तापमान आणि श्वसन वाढते ः जनावर अतिरिक्त उष्णता बाहेर टाकण्यासाठी जलद श्वास घेते, धाप लागते आणि तोंड उघडून श्वास घेते. शरीराचे तापमान वाढणे गंभीर ताणाचे लक्षण आहे.
२. चारा सेवन कमी होते ः उष्णता निर्माण होऊ नये म्हणून जनावर कमी खाते. ऊर्जा, प्रथिने आणि पोषक घटकांचा पुरवठा घटतो. दूध देणाऱ्या गाईंमध्ये हा परिणाम अधिक जाणवतो. टीएचआय प्रत्येक युनिट वाढल्यास चारा सेवन सुमारे ४ टक्के कमी होऊ शकते.
३. रवंथ आणि रुमेनच्या कार्यात बदल ः रवंथ कमी होते, लाळेचे प्रमाण व बफरिंग क्षमता बदलते आणि रुमेन आंबवण्याच्या प्रक्रियेत फरक पडतो. अनियमित खाणे आणि अपुरा प्रभावी तंतुमय चारा यामुळे जनावरांच्या पोटाचा (रुमेनचा) सामू कमी होण्याचा धोका वाढतो.
४. दूध उत्पादन आणि दुधाच्या घटकांवर परिणाम ः दूध उत्पादन, त्यातील प्रथिने आणि एकूण दूध घटकांचे उत्पादन घटते. फॅटमध्ये बदल होण्याची शक्यता असते, पण प्रत्येक जनावरात फॅट कमी होईलच असे नाही. उच्च उत्पादनाच्या संकरित गाईंमध्ये उन्हाळ्यात १० ते २५ टक्के (कधी ३० ते ४० टक्के) दूध घट नोंदविली जाते.
५. प्रजनन क्षमतेवर परिणाम ः माजाची लक्षणे कमी स्पष्ट दिसतात, गर्भधारणेचे प्रमाण घटते आणि भ्रूणाच्या सुरुवातीच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. सतत ताण राहिल्यास प्रजनन व्यवस्थापन अधिक कठीण होते. टीएचआय ७२ च्या वर गाई आणि ७५ च्या वर म्हशींमध्ये गर्भधारणा लक्षणीयरीत्या घटते.
६. पाणी आणि खनिजांची गरज वाढते ः धाप आणि घाम यामुळे पाण्याची गरज वाढते. कमतरता झाल्यास निर्जलीकरण, रक्ताभिसरणावरील ताण आणि दूध उत्पादनातील घट अधिक गंभीर होते. एका प्रौढ गाई/म्हशीला उष्णतेत ६० ते १२५ लिटर किंवा त्याहून अधिक पाणी लागू शकते.
शरीरात होणाऱ्या बदलांचा सारांश :
शरीरातील प्रक्रिया--- उष्णतेच्या ताणाचा संभाव्य परिणाम
श्वसन व तापमान नियंत्रण--- श्वसनाचा वेग व शरीराचे तापमान वाढू शकते
चयापचय--- उष्णता नियंत्रित करण्यासाठी ऊर्जेचा वापर बदलतो
पचनसंस्था--- रवंथ व रुमेनचे कार्य कमी होऊ शकते
दूधनिर्मिती--- दूध व दुधातील प्रथिनांचे उत्पादन घटू शकते
प्रजनन--- माज, गर्भधारणा व भ्रूणाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो
रोगप्रतिकारक शक्ती--- संसर्गाचा धोका वाढू शकतो
शरीरस्थित---दीर्घकाळ ताण राहिल्यास चरबी व वजन कमी होऊ शकते.
जनावरातील ही लक्षणे तपासा ः
• जनावर नेहमीपेक्षा वेगाने श्वास घेत आहे का?
• खाद्य शिल्लक राहत आहे का किंवा चाऱ्याचे सेवन कमी झाले आहे का?
• रवंथ कमी झाले आहे का?
• दूध उत्पादनात अचानक घट झाली आहे का?
• जनावरे सावलीत एकत्र उभी राहत आहेत का?
• पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे का?
• माजाची लक्षणे कमी स्पष्ट दिसत आहेत का?
तीव्र धाप, तोंड उघडून श्वास घेणे, तोल जाणे किंवा जनावर पडून राहणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी.
-----------
इन्फो ः
उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी सविस्तर उपाययोजना ः
सावली आणि वायुवीजन (पर्यावरणीय व्यवस्थापन) ः
• पत्र्याच्या गोठ्यातील उष्णता कमी करावी. हवा खेळती ठेवा आणि योग्य क्षमतेचे पंखे वापरा.
• गोठ्याची उंची किमान ३ ते ५ मीटर ठेवा. पूर्व-पश्चिम दिशा चांगली. छतावर पांढरा रंग, गवत, गोणपाट किंवा शेडनेट टाकावे.
• झाडे (नीम, सुबाभूळ) लावा. म्हशींसाठी वॉलोइंग पॉन्ड (पाण्यात लोळणे) अत्यंत उपयुक्त.
• स्प्रिंकलर/फॉगर + पंखे यांचा एकत्रित वापर (काही मिनिटे ओले करणे + पंखे) प्रभावी ठरतो. टीएचआय ७२ च्या वर वापर सुरू करा.
स्वच्छ थंड पाणी उपलब्धता ः
• पाण्याच्या टाक्या आणि कुंड्या नियमित स्वच्छ करा. पुरेशी जागा आणि प्रवाह असावा.
• थंड पाणी, इलेक्ट्रोलाइट्स (मीठ, खाण्याचा सोडा) उपयुक्त ठरू शकते.
थंड वेळेत आणि योग्य पद्धतीने खाद्य ः
• सकाळी लवकर आणि संध्याकाळी/रात्री खाद्य देण्यावर भर द्या. दुपारच्या कडक उन्हात जनावरांची चराई टाळावी.
• गरम किंवा बुरशी लागलेले खाद्य काढून टाकावे.
• चारा सेवन कमी झाल्याने पोषक घनता वाढवा (बायपास फॅट, बायपास प्रोटीन). प्रभावी एनडीएफ योग्य ठेवा. तंतुमय खाद्य अचानक कमी करू नका.
संतुलित पशू आहार आणि खनिजे ः
• प्रभावी एनडीएफ, ऊर्जा, प्रथिने आणि इलेक्ट्रोलाइट्स (सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम) यांचा समतोल ठेवा.
• बफर्स (सोडिअम बायकार्बोनेट), अँटिऑक्सिडंट्स (व्हिटॅमिन ई, क, सेलेनियम, झिंक) आणि खनिज मिश्रण नियमित द्या.
एकत्रित व्यवस्थापन आणि इतर उपाय ः
• सावली + हवा खेळती ठेवणे + योग्य पद्धतीने शरीरावर पाणी शिंपडणे + आहार व्यवस्थापन यांचा एकत्रित वापर सर्वाधिक प्रभावी.
• प्रजनन आणि लसीकरण थंड वेळेत करा. माज ओळखण्यासाठी अधिक लक्ष द्या.
• गर्दी कमी ठेवा (गाईसाठी सुमारे ३.५ मी.वर्ग आच्छादित + ७ मी. वर्ग खुली जागा).
• स्थानिक/देशी जाती अधिक सहनशील असतात; दीर्घकालीन उपाय म्हणून त्यांचा विचार करा.
----------------
इन्फो ः
वासरांची विशेष काळजी :
थंड हवेची सोय : वासरांना थेट उन्हात बांधू नका. गोठ्यामध्ये खेळती हवा राहील याची खात्री करावी.
स्वच्छता : पावसाळ्यानंतर गोठ्यात दमटपणा आणि माश्या, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा.
पाण्याची उपलब्धता : वासरांच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे.
क्षार मिश्रण : उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी पाण्यात थोडे ग्लुकोज किंवा ओआरएस सारखे ओलावा टिकवून ठेवणारे क्षार मिश्रण मिसळून दिल्यास वासरांना लगेच ऊर्जा मिळते.
हिरवा चारा आणि आहार : दुपारच्या कडक उन्हात जास्त आहार देणे टाळावे. वासरांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थंड वेळेत हिरवा व पचायला हलका चारा द्यावा.
वासरांचा विशेष आहार : लहान वासरांना प्रथिनयुक्त आणि दर्जेदार ‘काफ स्टार्टर’ द्यावे, ज्यामुळे त्यांची वाढ वेगाने होते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
------------
इन्फो ः
आजारावर नियंत्रण ः
पांढरी हगवण : या दिवसांत वातावरणातील बदलामुळे लहान वासरांमध्ये पांढरी हगवण लागण्याचे प्रमाण वाढते. वासरू सुस्त दिसल्यास किंवा हगवण लागल्यास त्वरित पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.
जंतनिर्मूलन : पावसाळ्यानंतर वासरांच्या पोटात जंत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पशुवैद्यांच्या सल्ल्याने योग्य वेळेत जंताचे औषध द्यावे.
बाह्य परजीवींचे नियंत्रण : गोचीड, पिसवा आणि माश्यांपासून वासरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यात गोचीडनाशकाची पशुवैद्यकांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
------------
संपर्क ः डॉ. गणेश निटुरे, ९९७०१२३२२०
(लेखक पशुसंवर्धन विभागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.