esakal | पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 

बोलून बातमी शोधा

पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 

राज्यात किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सोमवारी पुणे परिसरात नोंदली गेली. सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसहून अधिक किमान तापमान वाढल्याचे निरीक्षण पुणे वेधशाळेने सोमवारी सकाळी नोंदविले.

पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सोमवारी पुणे परिसरात नोंदली गेली. सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसहून अधिक किमान तापमान वाढल्याचे निरीक्षण पुणे वेधशाळेने सोमवारी सकाळी नोंदविले. पुण्यात किमान तापमान 16.1, तर लोहगाव येथे 18.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या इतर भागांप्रमाणेच पुण्यातही फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे 38.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर सर्वांत कमी किमान तापमानाचा पारा नागपूर येथे 12 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पण, पुणे शहर आणि परिसरात किमान तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा सर्वाधिक उसळी मारली. लोहगाव येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा 4.3 अंश सेल्सिअसने, तर पुणे आणि नाशिक येथे 4.1 अंश सेल्सिअसने वाढले. 

राज्याच्या बहुतांश भागात आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यातून कमाल तापमानाचा पाराही वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. 18) आकाश निरभ्र राहणार असले, तरीही बुधवारपासून (ता. 19) पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली. त्यामुळे किमान तापमानाचा पारा वाढून 18 अंश सेल्सिअसपर्यंत पोचेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.