मुसळधार पावसाने घर कोसळले जीवीत हानी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

House Collapsed

मुसळधार पावसाने घर कोसळले, जीवीत हानी नाही.

आपटाळे : गोकुळाष्टमीचा उपवास असल्याने दोघेही रात्री एकत्र जेवायला बसलो. बाहेर मुसळधार पाऊस अन सोसाट्याचा वारा सुरूच होता अन अचानक सळसळ असा आवाज झाला, आवाज कसला येतोय हे पाहायला बाहेर पडले तर क्षणातच घराच्या साऱ्या भिंती कोसळायला लागल्या अन पाहताच क्षणी उघड्या डोळ्यासमोर सारा संसार हा उध्वस्त झाला. अशी दुर्दैवी वेळ निसर्गाच्या प्रकोपाने व मुसळधार पावसाच्या रूपाने आमच्यावर आली मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी व्यथा रत्ना रमेश पानसरे यांनी मांडली.

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील घाटघर येथे गुरुवार ता 18 रोजी रात्री 11 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत येथील रमेश जयराम पानसरे व रत्ना रमेश पानसरे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः नुकसान झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. मुसळधार पावसामुळे रमेश पानसरे यांच्या 14 फूट रुंदी व 40 फूट लांबी असलेल्या घराच्या भिंती पडल्याने घराचे पूर्णतः नुकसान झाले.

रमेश पानसरे यांच्या अंगावर लोखंडी अँगल व पत्रे पडल्याने त्यांना दुखापत झाली मात्र त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या घटनेतून सुखरूप बचावले. तर घराचे पत्रे, जीवनावश्यक सर्व साहित्य, धान्य, टीव्ही, फ्रीज यासह घरातील सगळ्या साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेने जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पानसरे यांनी व्यक्त केला. शनिवार व रविवार सुट्ट्यांमुळे नाणेघाट येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्याकरिता जवळपास दहा हजार रुपयांचा केलेला बाजारहाट देखील पूर्णतः वाया गेल्याची खंत पानसरे यांनी व्यक्त केली. दरम्यान ग्रामसेवक रामदास जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली तर तलाठी राजाराम केदारी यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी रमेश पानसरे यांनी केली आहे.

Web Title: Heavy Rain House Collapsed Aalephata Shirur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..