esakal | मुसळधार पावसामुळे पुणे तुंबले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain
मुसळधार पावसामुळे पुणे तुंबले

मुसळधार पावसामुळे पुणे तुंबले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: सकाळच्या सोनेरी किरणांनी सुरू झालेला पुणेकरांचा विकेंड, संध्याकाळी मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडीत परावर्तित झाला. शहर व उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर काही ठिकाणी घरामध्ये, दुकानांत आणि बाजारपेठेत पाणी शिरल्याच्या गंभीर घटना घडल्या. शनिवारी रात्री साडेआठवाजेपर्यंत शिवाजीनगरला ५०, तर लोहगावात ७५ मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.

दुपारपर्यंत अंशतः ढगाळ असलेला आकाशात संध्याकाळी काळ्याभोर ढगांनी गर्दी केली. त्यानंतर आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांसह विकेंड खरेदी आणि फेरफटक्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. रात्रीच्या वाढत्या अंधाराबरोबरच शहर व उपनगरात बहुतेक ठिकाणी पावसाच जोरही वाढताना दिसला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच वाहनांच्या संथगतीमुळे वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली.

हेही वाचा: Photo : पुणे शहराला पावसाने पुन्हा झोडपले

सोमवार (ता.११) पर्यंत शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारनंतर शहरात काही अशी उघडीप जाणवेल. मात्र शुक्रवार (ता.१५) नंतर पुन्हा एकदा शहरात दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पिसोळीत ग्रामपंचायतीवर वीज पडली

पुण्याच्या पूर्व भागात सात ठिकाणी घरात पाणी शिरले, तर येरवडा, वाडिया कॉलेज आदी पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिसोळी येथे ग्रामपंचायतीजवळ वीज पडली, त्यामुळे मिटरबॉक्स ला आग लागली होती. यात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुठे किती पाऊस?

मुख्य शहर ४९.२

लोहगाव ७५

चिंचवड ७०

लवळे ७.५

मगरपट्टा २३.५

loading image
go to top