खेड तालुक्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस 

Rain-Water
Rain-Water

घरांमध्ये घुसले पाणी; शेतजमिनी वाहून गेल्या, बांध, तलाव फुटले 
पुणे - उत्तरा नक्षत्राच्या पावसाने शनिवारी जिल्ह्याच्या अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले. दुपारी ढगफुटीसदृश झालेल्या या पावसामुळे ओढे- नाल्यांना पूर आला. शेतजमिनी वाहून गेल्या, उभी पिके पाण्याखाली गेली. काही ठिकाणी बांध, तलाव फुटले. घरांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

चास - मिरजेवाडी (ता. खेड) येथे ढगफुटीसदृश पावसामुळे वनविभागाच्या हद्दीतील जाळदेव पाझर तलाव फुटला. त्यामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान होऊन शेतातील उभी पिके वाहून गेली, विहिरी गाडल्या गेल्या, विद्युत पंप वाहून गेले. खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनाम्याचा आदेश दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला. वनविभागाने सन 2004 मध्ये सुमारे पाच लाख रुपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी बांधलेला जाळदेव पाझर तलाव या पावसामुळे मधोमध फुटला. यामुळे सुमारे दोनशे शेतकऱ्यांच्या जवळपास शंभर हेक्‍टर शेतजमिनींचे नुकसान झाले. तेली यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला. त्यांच्यासमवेत मंडल अधिकारी सविता घुमटकर, सरपंच बाळासाहेब बुटे, कोतवाल अजित रत्नपारखी, वनपाल रामदास गोकुळे, वनरक्षक ए. बी. नाईकवाडे, नववाथ चव्हाण, राजाराम सातकर होते. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील चासकमान परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या- नाल्यांना पूर आला. काढणीयोग्य झालेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. लागवडीसाठी केलेली कांदा रोपे भुईसपाट झाली, काही ठिकाणी वाहून गेली. गेल्या दोन दिवसांपासून पश्‍चिम पट्ट्यात ढगाळ हवामान होते, मात्र पाऊस पडत नव्हता. भाताला ओंब्या लगडण्यास सुरुवात झाल्याने पिकाला पावसाची गरज होती, मात्र परिपक्व झालेल्या सोयाबीनला पाऊस धोकादायक होता. शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतात पाणी साचल्याने खरीप पिके विशेषतः सोयाबीनचे पीक भिजल्याने शेंगा गळून गेल्या. पाणी साचल्याने कांद्याची रोपे खराब झाली. अनेक ठिकाणी वाफे फुटल्याने रोपे वाहून गेल्याची माहिती पापळवाडीतील नंदू शिंदे व परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. 

ओढ्या- नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. पापळवाडी ते बहिरवाडी दरम्यानच्या ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. घनवटवाडी, मिरजेवाडी, बहिरवाडी, वाडा या परिसरातही पावसाने नुकसान झाले. 

राजगुरुनगर परिसरात तुफान पाऊस 
राजगुरुनगर - राजगुरुनगर परिसरात दुपारी बारा वाजता ढगफुटीसारखा तुफान पाऊस पडला. त्यामुळे परिसरातल्या ओढ्यांना पूर आला. पावसाचा जोर इतका होता की, काही फुटांवरचे काही दिसत नव्हते. पुणे- नाशिक महामार्गावर वाहने दिवे लावून संथपणे चालली होती. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. सखल भागात डबकी साचली. काही ठिकाणी बांध फुटले. या पावसाने सोयाबीन, बटाट्याचे नुकसान झाले. ही दोन्ही पिके काढणीस आलेली आहेत. कांदे लागवड सुरू झालेली असून नुकतीच लावलेली रोपे पाण्यात बुडाली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com