पुण्यात पावसाचे थैमान; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

काही ठिकाणी झाडे पडल्याचेही दिसत होते.जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून,हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.म्हणजे,जिल्ह्यात१५.६ते ६४.४मिलिमीटर पाऊस पडेल,असेही खात्याने सांगितले.

पुणे - शहरामध्ये दिवसभर पडणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरींनी बुधवारी रात्री नऊनंतर रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपले. रात्री साडेअकराच्या दरम्यान पावसाचा वेग मंदावला. परंतु, तोपर्यंत अनेक ठिकाणी एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता, शिवाजी रस्ता आदी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी झाडे पडल्याचेही दिसत होते. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. म्हणजे, जिल्ह्यात १५.६ ते ६४.४ मिलिमीटर पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरासह उपनगरांमध्ये बुधवारी सकाळी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यानंतर दुपारी मध्यम स्वरूपाचा तर सायंकाळनंतर पावसाचा वेग वाढला. रात्री नऊनंतर सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. पुण्यात सकाळी साडेआठ ते साडेअकरापर्यंत ९६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी साडेआठ वाजेपर्यंत १९.८ मिमी. पाऊस होता. ७६ मिमी पाऊस अवघ्या दोन तासांत कोसळला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

का पडतोय पाऊस?
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली. महाराष्ट्राचा दक्षिण भाग व उत्तर कर्नाटककडून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या पश्‍चिममध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. गुरुवारी कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुण्याचे तापमान घसरले
पुण्यात ३३.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमान तापमानाचा पारा अवघ्या चार दिवसांमध्ये ६.२ अंश सेल्सिअसने कमी झाला. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

महाराष्ट्राच्या मध्यावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. हा चक्रावात हळूहळू पूर्वेकडून पश्‍चिमेकडे सरकत आहेत. ही हवामानातील अत्यंत दुर्मिळ घटना आपल्या भोवताली घडत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात अंदमानच्या जवळ तयार झाले. त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. आंध्र प्रदेशची किनारपट्टी या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी (ता. १३) सकाळी ओलांडली. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत आहे. चक्रीवादळाची सुरवात कमी दाबाच्या क्षेत्रातून होते. त्याची तीव्रता चक्रीवादळ निर्माण होण्यापर्यंत वाढली नाही. पण, त्यानंतरही कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशवरून तेलंगणामार्गे महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन पोचले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्याच्या दक्षिणेतून प्रवास
कमी दाबाचे क्षेत्र तेलंगणामार्गे महाराष्ट्रात आले. सोलापूरजवळ त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. हे कमी दाबाचे क्षेत्र पुण्याच्या दक्षिण भागातून पुढे मुंबईच्या दिशेने प्रवास करेल. येत्या गुरुवारी (ता. १६) ते मुंबईजवळ अरबी समुद्रात जाईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

तीव्रता वाढण्याचा धोका 
कोकण गोव्यात पुढील तीन दिवसानंतर मुसळधार पावसाचा जोर ओसरले. पण, हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करेल. तेथे पुन्हा याला मोठ्या प्रमाणात बाष्प मिळेल. त्यामुळे त्याची तीव्रता पुन्हा वाढेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला इशारा
अर्ध्या महाराष्ट्राला हवामान खात्याने येत्या गरुवारी (ता. १५) पावसाचा इशारा दिला. कोकण गोव्याला ‘रेड अलर्ट’ असून, मध्य महाराष्ट्राला ‘आँरेंज’ तर, मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ वगळता बुधवारी बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सोलापूर येथे  ७९ मिमी पाऊस पडला.

रेड अलर्ट : 
सिंधुदुर्ग, रत्नागिरी 
आँरेंज अलर्ट : ठाणे, रायगड, सातारा,कोल्हापूर
यलो अलर्ट : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नगर, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, सांगली

उपनगरांमध्ये अनेक घरांत पाणी; आंबिल ओढ्याला पूर
वाघोली परिसरात सखोल भागात पाणी साचले. 
कात्रजच्या राजीव गांधी प्राणी  संग्रहालयाजवळील तलाव भरून वाहू लागला. 
आंबिल ओढ्याला पूर, लगतच्या सोसायट्यांमधील नागरिकांत भीती  
लक्ष्मीनगर, शाहू वसाहत व मार्केट यार्ड येथील आनंदनगरमधील घरांमध्ये पाणी 
सोमनाथनगरमध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी 
औंध, बाणेर रस्ता,  सकाळनगर, बोपोडी,  पंचवटी, महाळुंगे, 
बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार
वांजळे चौक उड्डाण पुलाखाली पाणी साठले 
पाषाण, सूस रस्ता येथील घरांत पाणी शिरल्याने तारांबळ 
गणेशनगर (वडगावशेरी)  भागात घरांभोवती पाणी, सांडपाणी वाहिन्या तुडुंब
ट्रेझर पार्क सोसायटीमध्ये पुराचा तडाखा 
सहकारनगर, संतनगर, अण्णा भाऊ साठेनगर येथील वस्तीमध्ये पाणी 
सिंहगड रस्त्याला नदीचे स्वरूप, विठ्ठलवाडीपासून रस्ता बंद
किरकटवाडीतील गावठाणातील घरांमध्ये पाणी, दुकानांचेही नुकसान
सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठा खंडित 
खडकी बाजारीतील  सराफ बाजारात सर्वत्र पाणी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in pune