पुणे - शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागात दाणादाण उडाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला, अनेक सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी घुसले. तर चौकाचौकात तळे निर्माण झाले होते..महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिवसभरात पाणी तुंबल्याच्या ९० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. खराब रस्त्यांमुळे पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी (ता. १९) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, सूस, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, औंध, बोपोडी, हडपसर, धानोरी, येरवडा, धायरी, कात्रज, कोंढवा, बाणेर, बालेवाडी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते..अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडे दिवसभरात पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. नागरिकांच्या तक्रारी येताच क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील पथकांकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु होते. तसेच पथ विभाग, मलनिःसारण विभागातील कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून काम करत होते..पाणी साठलेल्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली जात होती. पण हे पाणी तुंबल्यामुळे सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.शहरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पाणी घुसल्याच्या तक्रारी आल्या, तेथे लगेच मदत पाठवून २० मिनिटाच्या आत पाण्याचा निचरा करण्यात आला. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावध केले आहे. खडकवासला जवळ सुमारे १५ घरात पाणी घुसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.- गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग.गेल्या वर्षी एकतानगरीमध्ये पुराचे पाणी घुसले होते. यंदा खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक येथे तैनात करण्यात आले आहे.’- संदीप खलाटे, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग.शहरातील- धायरी नऱ्हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले, राष्ट्रीय महामार्गावर कोंडी- बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर- निलायम चित्रपटगृहा झाड पडले, त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा- आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्यावर पाणी तुंबले- सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता आदी भागात पाणी जमा झाल्याने वाहतूक कोंडी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.