पुण्याला पुन्हा पावसाने झोडपले; सोसायट्या, घरांमध्ये पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आज पहाटे तीनच्या सुमारास सुरु झालेला मुसळधार पाऊस साधारण अर्धा तास होता. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. तर, ओढ्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाची आठवण झाली.

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्याने आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास पुणे शहरासह उपनगरांना पावसाने झोडपले. पावसाचा जोर एवढा होता की ओढे, नाले भरून वाहू लागले. त्यामुळे अनेक घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.

आज पहाटे तीनच्या सुमारास सुरु झालेला मुसळधार पाऊस साधारण अर्धा तास होता. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. तर, ओढ्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाची आठवण झाली. कात्रजमधील पेशवेकालीन तलाव भरून वाहू लागल्याने आंबील ओढ्याकिनाऱ्यावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापर्यंत (ता. २३) वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पावसाचा दणका सुरूच असून, पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, जोरदार पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. माळेगाव येथे सर्वाधिक १४५; तर पणदरे येथे ११७, वडगाव निंबाळकर येथे १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये पावसाचा जोर प्रचंड असल्याने शेतामध्ये पाणीपाणी झाले, चारापिके पाण्याखाली गेली. ओढे नाले दुथडी भरून वाहिले. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील सुमारे बारा पूल पाण्याखाली गेले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी थांबली आहे. सोयाबीन भिजले, द्राक्षशेतीत पाणी साचल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Pune