पुण्यात आज पावसाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

छत्तीसगडचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे

पुणे - पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर आज  (शनिवार) मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. 

छत्तीसगडचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शनिवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम तर विदर्भात जोरदार  पाऊस पडेल. राज्यात रविवारपासून (ता. 30) पावसाची काहीशी उघडीप राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेश परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग ते गंगानगर दरम्यान मॉन्सूनची आस असलेला पट्टा सक्रिय आहे. याशिवाय दक्षिण उत्तर रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तो पट्टा तमिळनाडू ते कोमोरीन परिसराकडे काही प्रमाणात सरकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील काही भागात पाऊस होत असल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात 580 मिलिमीटर पाऊस 
शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान पावसाच्या मध्यम सरी पडू लागल्या. शिवाजीनगर येथील वेधशाळेत दिवसभरात 0.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 1 जूनपासून ते 28 ऑगस्टपर्यंत पुण्यात 580.9 मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान सरासरी 430.6 मिलिमीटर पाऊस पुण्यात पडतो. यंदा सरासरीपेक्षा 150.3 मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall warning in Pune today