
बारामती : तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसाने आज बारामतीकरांची दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे काही नागरिकांचे नुकसान झाले.दुसरीकडे लिमटेक नजिक नीरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने बारामती इंदापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कालव्याचा प्रवाह बंद करण्यात आला असल्याने काही काळानंतर पाणी ओसरले, मात्र या पाण्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसान झाले. सात जण एका घरात अडकले होते, त्यांनाही बारामती नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने सुखरूप बाहेर काढले.