"ऑक्‍टोबर हिट' नव्हे, तर पाऊस; पुढील दोन दिवसात मुसळधार 

rain-pune
rain-pune

पुणे- ऑक्‍टोबर म्हणजे उन्हाचा चटका असे समीकरण आपल्या मनात पक्क बसलंय; मात्र पुणेकर सलग दुसऱ्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये "हिट' नव्हे, तर पाऊस अनुभवत आहेत. गेल्या पाच वर्षांतील ऑक्‍टोबरमधला उच्चांकी पाऊस यंदा पुण्यात नोंदला गेला आहे. 

पुण्यात ऑक्‍टोबरमध्ये कमाल तापमानाचा पारा 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. या वर्षी आतापर्यंत 33.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली; पण त्यानंतर पावसाने जोर धरला. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा झपाट्याने सरासरीपेक्षा खाली घसरला. गेल्या आठवड्याभरात पावसाच्या सलग सरी शहर आणि परिसरात हजेरी लावत होत्या. त्यामुळे ऑक्‍टोबर हिट कमी होऊन पुणेकर पावसाळा अनुभवत आहेत. 

37.2 मिलिमीटर अधिक पाऊस 
पुण्यात यंदा ऑक्‍टोबरच्या 21 दिवसांमध्ये 272.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या 112.1 मिलिमीटर पाऊस गेल्या गुरुवारी (ता. 15) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नोंदला गेला. ऑक्‍टोबरपर्यंतचा सर्वाधिक पाऊस 1892 मध्ये 440.7 मिलिमीटर नोंदला गेला; पण गेल्या दहा वर्षांत 2018 मध्ये सर्वाधिक 360 मिलिमीटर पाऊस नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 2019 मध्ये शिवाजीनगर येथील वेधशाळेत 235 मिलिमीटर पाऊस पडला. यंदा गेल्या वर्षीपेक्षा 37.2 मिलिमीटर पाऊस जास्त पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

दृष्टिक्षेपात पुण्यातील पाऊस 
वेधशाळा ......... 1 ऑक्‍टोबरपासूनचा पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
शिवाजीनगर .... 272.2 
लोहगाव .......... 258.3 
पाषाण ............ 263.4 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील दोन दिवस पावसाचे 
पुण्यात येत्या गुरुवारी (ता. 22) आणि शुक्रवारी (ता. 23) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला जाईल. शनिवारी (ता. 24) हलक्‍या स्वरूपाचा पावसाची शक्‍यता असून, त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

राज्यात पावसाचा कमी-अधिक जोर 
राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांनंतर पावसाचा जोर आणखी कमी होईल. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हवामानाची सद्यःस्थिती 
अरबी समुद्राच्या पश्‍चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसांत उत्तर पश्‍चिम भागाकडे सरकण्याची शक्‍यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यंत कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्‍याचे ऊन पडणार असून, ऑक्‍टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com