गंगाधाम चौकातील कोंडी फुटता फुटेना 

traffic 13.JPG
traffic 13.JPG

पुणे : शहरातून दक्षिण भागाकडे जाणारा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर तसेच गोळीबार मैदान चौक ते खडी मशिन चौक हे दोन प्रमुख रस्ते कोंडीच्या विळख्यात अडकले आहेत. गंगाधाम रस्ता निम्म्याहून अधिक रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. तर खडी मशिन रस्ता दाट वस्तीच्या कोंढव्यातून जात असल्याने वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकला आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून शत्रुंजय मंदिर मार्गावरील आईमाता मंदिराजवळील रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याला वाहतूक कोंडीने ग्रासले आहे. या रस्त्याचे तातडीने काम करून दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथील वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकलेली असते. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाही.
विद्यार्थ्यांना शाळेत पोचायला उशीर होतो. तर चाकरमान्यांना घरातून वेळेवर निघूनसुद्धा कामावर वेळेवर पोचणार की नाही, याची शाश्वती नसते. आईमाता मंदिराजवळ खिंडीत दोन्ही बाजूने खडी पसरली आहे त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. तसेच, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोडाउन व कात्रज रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. 

रस्त्यावर कचऱ्याचा ढीग 
आईमाता मंदिर ते खडी मशिन चौकाच्या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला दिसतो. पावसामुळे कचरा भिजून दुर्गंधी पसरली आहे. याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

कोंडी फोडण्यासाठी आवश्‍यक उपाय 
- रस्त्याचे अर्धवट काम लवकर करावे. 
- वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे. 
- रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची गरज. 
- उड्डाण पुलाची आवश्‍यकता. 

'गंगाधाम चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कायम पोलिस कर्मचारी असतात. तर आईमाता मंदिरापासून पुढील भागात सहकारनगर हद्दीतील पोलिस कर्मचारी असतात. वाहतूक नियंत्रणाचा आमचा कायम प्रयत्न असतो.' 
- जगन्नाथ काळे, वाहतूक अधिकारी

' सेव्हन लव्हज्‌ चौकापासून गिरीधरभवन चौकापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. याचा उपयोग भविष्यात होईल, असे वाटते आहे. गंगाधाम चौकातही अशाच एका उड्डाण पुलाची गरज आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे.'
- रमाकांत क्षीरसागर, नागरिक, काकडे वस्ती 

'आईमाता मंदिराजवळील रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. घरून लवकर निघून देखील कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो. '
- विशाल शिंदे, विद्यार्थी, व्हीआय टी कॉलेज 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com