रमजानचे उपवास करीत मुस्लीम बांधवांकडून सर्वधर्मियांची सेवा

अऩ्वर मोमीन 
रविवार, 24 मे 2020

स्वतः तहानलेले व उपाशी असताना जेव्हा एक जीव दुसऱ्याच्या तहान भुकेचा विचार करतो तो क्षण अल्लाहला अधिक भावतो. इस्लाममधील या वचनानुसार आचरण करीत नगर रस्ता परिसरातील मुस्लीम बांधवांच्या विविध संस्थांनी गेले महिनाभर वेगवेगळ्या मार्गाने गोरगरीबांची निस्वार्थपणे सेवा केली

वडगाव शेरी : स्वतः तहानलेले व उपाशी असताना जेव्हा एक जीव दुसऱ्याच्या तहान भुकेचा विचार करतो तो क्षण अल्लाहला अधिक भावतो. इस्लाममधील या वचनानुसार आचरण करीत नगर रस्ता परिसरातील मुस्लीम बांधवांच्या विविध संस्थांनी गेले महिनाभर वेगवेगळ्या मार्गाने गोरगरीबांची निस्वार्थपणे सेवा केली आणि मानवतेचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.

दरम्यान, ऐन उन्हाळ्यात पवित्र रमजान महिन्याच्या पंधरा तासांच्या निरंकार रोजामुळे (उपवास) दिवसभर घशाला पडणाऱ्या कोरड ची तमा न बाळगता हे मुस्लीम बांधव  मानवधर्मासाठी संपुर्ण महिना झटले. उद्याच्या रमजान ईदनिमित्त या बांधवांच्या चेहऱ्यावर त्यामुळे निराळेच समाधान असणार आहे. 

कोरोना संकटकाळात खऱाडी, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, येरवडा, विमाननगरमधील हजारो कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप, घरी परतणाऱ्या परप्रांतिय हजारो मजुरांसाठी रोज गरमागर भोजनाची व्यवस्था असेल किंवा पोलिस व आरोग्य सेवकांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे. आदी प्रकारच्या सेवा देण्यासाठी संपुर्ण लॉकडाऊन काळात हे बांधव झटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वडगाव  शेरीतील आसरा फौडेशनच्या वतीने तीन लाख रूपयांच्या मदतीतून सहाशे कुटुंबाना शिधा वाटण्यात आला. तसेच शेकडो घरांना घरपोच भाजीपाला पुरवण्यात आल्याची माहिती संस्थेचे फिरोज मनियार यांनी दिली. या कार्यासाठी संस्थेचे तीस ते चाळीस युवक महिनाभर राबत होते. 

वडगाव शेरीतील दारूल इस्लाम संस्थेच्या वतीने गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांना रमजान महिन्यात रोज अन्नछत्र चालवण्यात आले. तसेच पायी जाणाऱ्या व तहानलेल्या मजुरांसाठी टँकरद्वारे पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबत लॉकडाऊन काळात सर्वधर्मिय सातशे गरीब कुटुंबांसाठी सुमारे तेरा लाख रूपयांचे शिधा वाटप करण्यात आला. यासाठी मौलाना शकिल, हाजी इक्बाल शेख, खराडीतील इम्तियाज शेख, फिरोज मनियार आदी बांधवांनी यासाठी प्रयत्न केले. नासिर शेख मित्र परिवाराच्या वतीने पोलिसांना, आऱोग्य सेवकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

पुण्यातील ऑल इंडिया कौमी तंझिम संस्थेच्या वतीने चारशे कुटुंबांना शिधा वाटण्यात आला. तसेच चारशे गरीब कुटुंबांना चारशे किलो खजुरांचे वाटप करण्यात आले. यासोबत गरीब मुस्लीम बांधवांची ईद गोड व्हावी या हेतूने येरवडा, नागपुरचाळ, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, ताडीवाला रोड आदी भागातील चारशे कुटुंबांना सुका मेव्याचे किट देण्यात आले.   

खराडीतील अल-अमिन फाऊंडेशनने ना नफा ना तोटा तत्वावर सुमारे चार लाख रूपयांचा सुका मेवा परिसरातील बांधवांना ईदसाठी उपलब्ध करून दिला. कासीम शेख आणि मित्रपरीवाराने गरजुंना रूग्णालयातील उपचार काळात जेवणाचा डबा दिला. तसेच रामवाडी व सिद्धार्थनगर परिसरातील सुमारे दिडशे कुटुंबांना शिधा देण्यात आला.

विश्रांतवाड़ी येथील शुमाईल संस्थेच्या वतीने रिजवाना शेख व शब्बीर शेख, कुंदन विश्वकर्मा यांच्यावतीने विश्रांतवाडी वस्तीत अऩ्नदान, धान्यवाटप करण्यात आले. हुसेनशाह बाबा दर्गा ट्रस्ट आणि लंगर कमिटी तीनशे लोकांना अऩ्नधान्याचे वाटप व शिरखुर्मासाठी तीनशे पाकीट सुका मेव्याचे साहित्य गरीब मुस्लीम बांधवांसाठी वाटप केले. खराडीतील जामा मज्सिद ट्रस्टच्या वतीने शेकडो कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. तसेच गावी परतणाऱ्या मजुर बांधवांसाठी सलगपणे अन्नदान करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विमाननगर येथील म्हाडा कॉलनी मुस्लीम जमातच्या वतीने परिसरातील शंभर कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला.   कोरोनाच्या संकट काळात मानवसेवा हिच ईश्वर सेवा मानून आसरा फौंडेशनकडून आम्ही गरीबांना शिधा वाटप, भाजीपाला वाटप केले. हिच इस्लाम धर्माची शिकवण आहे. यासाठी वडगाव शेरीतील युवकांनी मोठी मेहनत घेतली. - फिरोज मनियार (वडगाव शेरी)

भुकेला धर्म नसतो. गावी परतणाऱ्या मजुर बांधवांसाठी अन्नछत्र चालवताना स्वतःचा उपवास कधीच आठवला नाही. सेवा ही संधी मानली. - हाजी इक्बाल शेख (खराडी)

आपल्या भुकेपेक्षा दुसऱ्याच्या तहान भुखेची जाणीव ठेवण्याची शिकवण मोहम्मद पैगंबरांनी दिली आहे. त्यानुसार ऑल इंडिया कौमी तंझीम पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने आम्ही अन्नधान्य पुरवण्याची सेवा केल्याचा आनंद आहे - हाजी झाकिर शेख ( येरवडा)

कोरोनाच्या संकटामुळे आम्ही सर्वच बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी परिसरातील गरीबांना मदत करण्याची संधी मिळाली व ते करताना रमजान महिन्याचे उपवास केले याचा आनंद वाटतो. - शब्बीर शेख ( धानोरी)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from Muslims to other religions