'सारथी' आली आमच्या कामा, म्हणूनच आम्ही कलेक्टर होऊ शकलो! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांना दिशा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेचे‌ (सारथी) अस्तित्व सिद्ध होऊ लागले आहे. या संस्थेने पाठबळ‌ दिलेल्या सागर मिसाळ, प्रसाद शिंदे आणि निमिष पाटील या तीन तरुणांनी केंद्रीय‌ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे.

पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांना दिशा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेचे‌ (सारथी) अस्तित्व सिद्ध होऊ लागले आहे. या संस्थेने पाठबळ‌ दिलेल्या सागर मिसाळ, प्रसाद शिंदे आणि निमिष पाटील या तीन तरुणांनी केंद्रीय‌ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. सारथी संस्था नसती, तर सामान्य कुटुंबातील तरुणाला यूपीएससी परीक्षेच्या‌ यशापर्यंत‌ मजल मारता आली नसती, अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली आहे.

सागर मिसाळ याला परीक्षेत 204 श्रेणी मिळाली आहे. तो मूळचा वाघोलीचा (ता. माळशिरस). त्याचे‌ वडील शेतकरी. या यशात‌ सारथीचा मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले. समाजात अशी अनेक गरीब मुले आहेत, ज्यांची‌ क्षमता आहे; पण त्यांना आर्थिक स्थितीमुळे स्वप्ने‌ साकारता‌ येत नाही. मला 'सारथी'कडून आर्थिक पाठबळ मिळाल्याने मला दिल्लीत प्रशिक्षण घेता आले. महाविद्यालयात असताना स्पर्धा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहात‌ होतो. त्यातून त्याची गोडी लागली आणि दुसऱ्या प्रयत्नातच यश मिळाले, असे‌ तो म्हणाला.

प्रसाद शिंदे‌ हा संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील रहीमतपूरचा. त्याला परीक्षेत 287 श्रेणी मिळाली आहे. त्याचे‌ आई-वडील निवृत्त शिक्षक. गेल्यावर्षी वडिलांचे निधन झाले. त्याला सारथी आर्थिक पाठबळ दिले. दिल्ली‌ येथे यूपीएससी परीक्षेचे‌‌ कोचिंग घेण्यासाठी शुल्क तर भरले, याशिवाय‌ दरमहा तेरा हजार विद्यावेतन दिले.

याबद्दल प्रसाद म्हणतो, "सामान्य कुटुंबात‌ जन्म घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बुद्धिमत्ता असते. पण आर्थिक पाठबळाविना तो काही करू शकत नाही. मला यूपीएससी परीक्षा द्यायची होती. त्यासाठी दिल्लीत राहून प्रशिक्षण घेणे कठीण होते. मात्र सारथी‌ संस्थेने हात दिला आणि आम्ही दिल्लीत‌ राहून प्रशिक्षण घेऊ शकलो. ही संस्था नसती, तर हे यश शक्य नव्हते. म्हणूनच या संस्थेचे अस्तित्व महत्त्वाचे वाटते. ही संस्था‌ टिकली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of 'Sarathi' organization, many students became officers