esakal | विदर्भातील तरुणांनी अनुभवला मदतीचा "मुळशी पॅटर्न' 
sakal

बोलून बातमी शोधा

hand

कोकणातून 550 किलोमीटर चालत जाणाऱ्यांची माले ग्रामस्थांनी स्वीकारली लॉकडाउन संपेपर्यंत जबाबदारी 

विदर्भातील तरुणांनी अनुभवला मदतीचा "मुळशी पॅटर्न' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माले : लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे कोकणातून थेट विदर्भात चालत निघालेल्या तरुणांच्या राहण्याची व जेवणाची माले (ता. मुळशी) ग्रामस्थांनी जबाबदारी स्वीकारली आहे. मदतीच्या या "मुळशी पॅटर्न'मुळे विदर्भातील हे तरुण भारावून गेले आहेत. 

पोटाची खळगी भरण्यासाठी विदर्भातील एका खेड्यातून थेट कोकणात आलेल्या सहा तरुणांवर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली. त्यामुळे त्यांनी, "गड्या आपला गावच बरा,' असा विचार करून थेट पायी सुमारे 550 किलोमीटर अंतर चालत जाण्याचा निर्णय घेतला. पण, माले येथील चेक नाक्‍यावर पोलिसांनी त्यांना अडवले. येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील धोक्‍याची जाण करून दिली आणि त्यांची ग्रामपंचायतीच्या सभागृहात राहण्यापासून खाण्यापर्यंतची सर्व व्यवस्था केली. 

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील गवंढाळा या गावातील प्रभाकर रतन तायडे, प्रदीप हरिभाऊ तायडे, नारायण पांडुरंग तायडे, शिदेधन पांडुरंग गवई, विकास वासुदेव सरदार, सहदेव पुंडलिक खरात हे सेंट्रिंगचे काम करणारे सहा तरुण कर्नाटकातील ठेकेदारावर विश्‍वास ठेवून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील खरोली येथे आले. तेथे त्यांचे काम सुरू होते. मात्र, संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाला. या वेळी आपल्यासोबत आलेल्या कामगारांची व्यवस्था करणे संबंधित ठेकेदाराचे काम होते. मात्र, तो त्यांना तेथेच तशाच अवस्थेत सोडून निघून गेला. त्यानंतर या तरुणांची या अनोळखी भागात उपासमार होऊ लागली. त्यामुळे त्यांनी पायी चालत गावाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 16 एप्रिल रोजी चालायला सुरवात केली. तिसऱ्या दिवशी ते ताम्हिणी घाट मार्गे 80 किलोमीटरवरील माले येथे पोचले. मात्र, तेथे असलेल्या चेकनाक्‍यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि विचारणा केली. त्यावेळी त्यांची कर्मकहाणी समोर आली. 

या तरुणांना पुढे चालत पाठवणे धोक्‍याचे होते. त्यामुळे येथील सरपंच सोनल सुहास शेंडे, ग्रामसेवक प्रशांत सूर्यवंशी, माजी सरपंच अनिल आधवडे, नवनाथ जोरी, हेमंत पासलकर, हनुमंत ठकोरे, राहुल वाघमारे, अनंता गोळे, अनंता शेंडे, श्‍याम शेंडे, सुहास सणस, किसन आधवडे, सचिन जाधव व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच, त्यांना जेवणासाठी किराणा, धान्य, मसाले दिले. तेल, साबण अशा जीवनावश्‍यक वस्तूही दिल्या. लॉकडाउन संपेपर्यंत या तरुणांची व्यवस्था करणार आहे. 

या तरुणांना घरी पाठवण्यासाठी थेट बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आमदार आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, लॉकडाउनमुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांनी या तरुणांची सोय करण्याची स्थानिक प्रशासनाला विनंती केली. मात्र, आम्हीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांची लॉकडाउन संपेपर्यंत व्यवस्था करणार आहे. 
- सोनल शेंडे
सरपंच, माले (ता. मुळशी) 
 

 
 

loading image